एस.टी.बसमधून दारूची वाहतूक करणारा सुरतचा ‘पुष्पा’ धुळ्यातील पोलीस यंत्रणेच्या जाळ्यात

एस.टी.वाहकाच्या सतर्कतेचे कौतुक : 25 हजारांची देशी दारू जप्त


‘Pushpa’ of Surat, who transports liquor in ST bus , in the net of police system in Dhule धुळे : चंदन तस्करीच्या नवनवीन फंड्यांवर आधारीत पुष्पा चित्रपटाच्या कथानकाला साजेशी घटना धुळ्यात घडली. सुरत येथे दारू विक्रीला प्रतिबंध असलातरी रेल्वेसह खाजगी वाहनाने मोठ्या प्रमाणावर शौकीनांना मद्याचा चढ्या दरात पुरवठा होतो हे सर्वश्रृत आहे. सुरतमधील पुष्पाने दारू वाहतुकीसाठी चक्क एस.टी. बसचा आधार घेतला मात्र प्रवाशाच्या हालचाली संशयास्पद वाटल्यानंतर सतर्क एस.टी.वाहकाने (कंडक्टर) स्थानकप्रमुखांसह पोलीस यंत्रणेला माहिती कळवल्यानंतर प्रवीण मोतीराम पाटील (सुरत) या संशयिताच्या मुसक्या बांधण्यात आल्या. संशयिताच्या ताब्यातून 24 हजार 500 रुपये किंमतीची देशी दारू जप्त करण्यात आली.

तांदळाच्या साळीआड दारूची वाहतूक
धुळे मध्यवर्ती बसस्थानकात शुक्रवारी सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास अमळनेर-बडोदा बस (क्रमांक एम.एच.20 बी.एल.2534) आल्यानंतर एक प्रवासी सोबतच्या चार गोण्यांमध्ये काहीतरी संशयास्पद वस्तू नेत असल्याचे वाहकाच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी ही बाब स्थानक प्रमुखांना कळवली. बस स्थानकात कर्तव्यावरील असलेले हवालदार ज्ञानेश्वर साळुंके व पोलीस नाईक वैभव वाडीले यांना ही माहिती दिल्यानंतर त्यांनी शहर पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना माहिती कळवल्यानंतर शोध पथकातील कुंदन पटाईत, महेश मोरे, मनीष सोनगीरे, गुणवंत वाघ हे बस आगारात दाखल झाले. संशयित प्रवीण पाटील यास ताब्यात घेतल्यानंतर त्याच्याकडील चार गोण्यांची झडती घेतली असता तांदळाच्या साळीत तब्बल दारूच्या सातशे बाटल्या अमळनेर येथून सुरतला विक्री करण्यासाठी घेऊन जात असल्याचे संशयिताने कबूल केले. या प्रकरणी शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !