अमळनेरातील कुविख्यात गुन्हेगार रफिक उर्फ काजल शेख स्थानबद्ध

Notorious criminal Rafiq alias Kajal Shaikh located in Amalner अमळनेर : पोलीस दप्तरी कुविख्यात म्हणून ख्याती असलेला रफिक उर्फ काजल शेख रशीद यास अमरावती सेंट्रल जेलमध्ये दोन वर्षांसाठी स्थानबद्ध करण्यात आल्याने गुन्हेगारी वर्तुळात खळबळ उडाली आहे. यापूर्वी शहरातील दादू धोबी, विशाल सोनवणे, शुभम देशमुख उर्फ दाऊद यांच्यावर कारवाई झाल्यानंतर आता चौथ्या गुन्हेगारावर कारवाई झाल्याने गुन्हेगारी वर्तुळाने कारवाईचा धसका घेतला आहे.
आरोपीची ही आहे गुन्हेगारी पार्श्वभूमी
रफिक उर्फ काजल याच्यावर आतापर्यंत 11 गुन्हे दाखल असून सहा गुन्हे अदखलपात्र दाखल आहेत. महाराष्ट्र जुगार प्रतिबंध कायदे अंतर्गत एकूण 11 गुन्हे दाखल असून महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 56 (1) (ब) प्रमाणे हद्दपारीची कारवाई चार वेळा तर प्रतिबंधात्मक कारवाई पाच वेळा करण्यात आली आहे. जबरी चोरी करणे, खंडणी मागणे, धारदार शस्त्र, बंदुकीचा वापर, स्फोटक पदार्थ जवळ बाळगून आणि मारहाण करून गंभीर दुखापत करणे, जातीयवादी गुन्हे करणे, दंगल माजवून गर्दी करून शस्त्र जवळ बाळगून लोकांमध्ये दहशत घालणे, बंदुकीचा धाक दाखवून जबरी चोरी करणे, एवढेच नव्हे तर जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे तसेच शासकीय कामात अडथळा आणण्याचे गुन्हे संशयितावर दाखल आहेत.
नूतन निरीक्षकांचा कारवाईचा धडाका
अमळनेर पोलीस ठाण्यात निरीक्षक विजय शिंदे यांनी पदभार घेतल्यानंतर गेल्या पाचच महिन्यात गुन्हेगारीला ठेचत आतापर्यंत चार गुन्हेगारावर एमपीडीएची कारवाई केली आहे. आरोपी काजल शेखबाबतही प्रस्ताव जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे पाठवल्यानंतर जिल्हाधिकार्यांनी त्यास अंतीम मंजुरी देत आदेश काढले. याकामी पोलीस अंमलदार किशोर पाटील, दीपक माळी, रवींद्र पाटील, शरद पाटील, सिद्धांत सिसोदे, सहा.पोलीस निरीक्षक राकेशसिंह परदेशी, विकास शिरोळे, बापू साळुंखे, कपिल पाटील, सुनील पाटील, योगेश श्रावण पाटील, घनशाम पवार, जितेंद्र निकुंभे, हर्षल पाटील, मिलिंद बोरसे, नाजिमा पिंजारी, नम्रता जरे, होमगार्ड कैलास पाटील आदींची भूमिका महत्त्वाची राहिली तर जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक नजन पाटील यांनी सातत्याने मार्गदर्शन व पाठपुरावा केला तसेच पोलीस हवालदार सुनील दामोदरे यांनी देखील सहकार्य केले.


