मद्यपी पतीचा पत्नीनेच काढला काटा : शिरपूर तालुक्यातील खुनाची उकल
शिरपूर : शिरपूर तालुक्यातील सांगवी पोलीस ठाण्यांतर्गत असलेल्या झेंडे अंजनजवळचा पुट्यापाडा येथील खुनाचा उलगडा करण्यात यंत्रणेला यश आले आहे. मद्यपी पतीच्या त्रासाला कंटाळून पत्नीनेच पतीला ठार केले. रामदास सिग्रेट पावरा असे मयताचे नाव असून या प्रकरणी मयताची पत्नी सुनंदा उर्फ बेबीबाई रामदास पावरा हिला अटक करण्यात आली. या प्रकरणी सांगवी पोलिसात सिगरेट देवसिंग पावरा (56) यांच्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
रोजच्या त्रासाला कंटाळून काढला पतीचा काटा
गुरूवारी सायंकाळी पतीला स्वत:च भरपूर दारु पाजून त्याच्या डोक्यावर लाटण्याने वार करून बेशुद्ध करण्यात आले व नंतर घरातील दोरीच्या सहाय्याने गळा आवळून पत्नीने पतीचा खून केला. सुरूवातीला सिगरेट पावरा यांनी सांगवी पोलिसांना गहाण ठेवलेली वनजमीन सोडवण्याच्या वादातून मुलाचा खून झाल्याचे सांगत काही संशयिताची नावे सांगितल्यानंतर संबंधिताना चौकशीकामी ताब्यात घेण्यात आले मात्र त्यांचा खुनात सहभाग नसल्याचे स्पष्ट होताच पोलिसांनी तपासाशी दिशा बदलली तर मयताची पत्नी गायब असल्याने अधिक संशय बळावला. गुन्हा घडल्यानंतर मयताची पत्नी सुनंदा उर्फ बेबीबाई रामदास पावरा ही घर सोडून पळाल्यानंतर पोलिसांनी तिला खैरखुटी येथून ताब्यात घेतले. चौकशी केल्यावर तिने खुनाची कबुली दिली.
मानसिक छळ असह्य झाल्याने उचलले टोकाचे
पती रामदास रोज मद्यपान करून शारीरीक व मानसिक छळ करीत असल्याने 1 जून रोजी सायंकाळी सात वाजता पती रामदासला मद्य पाजून त्याच्या डोक्यात लाटण्याने वार केला तसेच दोरीने गळा आळवल्याचे सुनंदा पावराने चौकशीत सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी सुनंदा उर्फ बेबीबाई रामदास पावरा हिला अटक केली. शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे व सहकार्यांनी गुन्ह्याची उकल केली.