भुसावळकरांची उकाड्यापासून सुटका : मान्सुनपूर्व पावसाची दमदार हजेरी
भुसावळ : राज्यात सर्वाधिक हॉट ठरलेल्या भुसावळ शहरवासीयांना रविवारी दुपारी अर्धा तास झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे मोठा दिलासा मिळाला. वादळी वार्यासह पावसाचे आगमन झाल्यानंतर वीजपुरवठा खंडित झाला तर चार तासापर्यंत सुरळीत होवू शकला नाही. शहरातील ब्राह्मण संघाजवळील रीदयम हॉस्पीटलनजीक एका ईमारतीची पडदी कोसळली मात्र सुदैवाने वाहनधारक नसल्याने हानी टळली.
शहरातील वीजपुरवठा ठप्प
वादळी पावसानंतर शहरातील उत्तर व दक्षिण भागातील वीजपुरवठा खंडीत झाला. दक्षिण भागातील पुरवठा अर्धा ते एक तासाने पुर्ववत झाला मात्र तापीनगर सबस्टेशनला जोडणार्या 11 केव्ही लाईनवर झालेल्या बिघाडामुळे सहा फिडर बंद झाले. तीन फिडरवर दोन तासांनी वीजपुरवठा सुरळीत झाला. तर उर्वरीत तीन फिडरवर तब्बल चार तासांनी वीजपुरवठा सुरळीत करण्यात यश आले. नेहमीप्रमाणे ग्राहकांनी विजेबाबत तक्रारी करण्यासाठी तक्रार निवारण कक्षावर फोन केला असता तो बंद आढळला तर अनेकवेळा सातत्याने तो एंगेजच आल्याने ग्राहकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
