‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ ; राष्ट्रवादी सुप्रीमो शरद पवारांना मारण्याची धमकी
Death threat to NCP President Sharad Pawar मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याच्या धमकी सोशल मिडीयाद्वारे मिळाल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनाही धमकी दिल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
असे आहे नेमके प्रकरण
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मिडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी देण्यात आली आहे. याबाबत खासदार सुप्रिया सुळे आणि राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने शुक्रवारी मुंबई पोलीस आयुक्तांची भेट घेत तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. सोशल मिडियावर आलेल्या त्या धमकीच्या स्क्रीन शॉटची झेरॉक्स पोलीस आयुक्तांना देण्यात आली.




दोषींवर कारवाईची मागणी
या प्रकरणी सुप्रिया सुळे म्हणाल्या की, शरद पवार यांना ट्विटद्वारे जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर आणि राजकारण महाराष्ट्राचे या ट्विटर हँडलवरुन पवार यांच्या संदर्भात आक्षेपार्ह ट्विट केले आहे. या दोन ट्विटर हँडलवर कारवाई करावी, अशी मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांनी केली आहे.
राज्यात सुरू आहे गुंडाराज
ही जी धमकी आली हे दुर्देव आहे, एवढा द्वेष बरोबर नाही. सध्या राज्यात गुंडाराज सुरू आहे, हे संपूर्ण एडमिस्ट्रेशनचे फेल्युअर आहे. या ट्विटच्या कॉमेंट वाचल्या एवढा द्वेष कुठून आला. या धमकीचा पाठपुरावा करुन आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली तर तत्काळ या व्यक्तींना अटक करावी अशी मागणीही त्यांनी करीत गृहमंत्र्यांनी या धमक्यांची नोंद घ्यावी, असेदेखील सांगितले.
खासदार राऊतांना फोनद्वारे धमकी
शिवसेना (उबाठा गट) खासदार संजय राऊत यांनाही जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर राज्यात खळबळ उडााली आहे. ही धमकी एका फोन कॉलच्या माध्यमाने देण्यात आली असल्याची माहिती स्वतः संजय राऊत यांचे भाऊ आमदार सुनील राऊत यांनी दिली. सुनील राऊत म्हणाले, माझ्या मोबाइलवर कॉल करून मला आणि संजय राऊत यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. यात, संजय राऊतांना सांगा की, रोज सकाळी माध्यमांसोबत बोलणे बंद करा. नाही तर, तुम्हाला आणि संजय राऊत यांना, दोघांनाही जीवे मारू, अशी धमकी देण्यात आली आहे.
तर गोळी मारण्याची धमकी
संजय राऊतांना आलेला धमकीचा फोन कॉल सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल होत आहे. यात धमकी देणारी व्यक्ती संजय राऊतांना सकाळची पत्रकार परिषदत बंद करायला सांगत आहे. तसेच न ऐकल्यास गोळी मारण्याची धमकी देत आहे.