भाजपात चांगल्या लोकांना प्रवेश दिला असता तर कदाचित चित्र वेगळे असते
माजी मंत्री एकनाथराव खडसे : भाजपाच्या मेगा भरतीवर केली टिका
जळगाव : मेगा भरतीबाबात भाजपातून सर्वात आधी मी नाराजी व्यक्त केली होती. मेगाभरती करताना नवख्यांना संधी दिली पण निष्ठावंतांना डावलले हे चंद्रकांत पाटलांनी मान्य केले असून पक्षातील निष्ठावंत बाजूला पडले अन् ते नवखे पदांवर बसले. विशेष म्हणजे मेगाभरतीमुळे आमची सत्ता येणार असं सर्वांनाच वाटत होतं. म्हणून तर अब की बार 220 पार अशी आमची घोषणा होती. जुन्यांना तिकीटं नाही दिले तरीही काही फरक पडणार नाही, असा विचार करुन अनेक तिकीटं कापण्यात आली. याचा, परिणाम आता जे सरकार आलंय, त्याचं मूळ बीज मेगाभरतीमध्येच आहे, असे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. चरीत्र न तपासता अनलिमिटेड प्रवेश दिल्याने पक्षाचे नुकसान झालं. मेगा भरती केली नसती किंवा चांगली लोकंच घेतली असती, तर आजचं चित्र वेगळं असतं, असेही खडसे म्हणाले.
मेगा भरतीवरून लगावला टोला
आकुर्डीतील पक्षाच्या बैठकीत भाजपात मेगा भरती ही मेगा चूक होती, अशी कबुली भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. भारतीय जनता पक्षाने सत्तेत येण्यासाठी विविध राजकीय पक्षांतून आयारामांना संधी दिली. त्यामुळे नुकसान झाल्याचेही ते म्हणाल्यानंतर ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनीही भाजपाला टोला लगावला आहे.





