वाहनधारकांनो ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची : जळगावातील आरटीओ कार्यालयाचे प्रादेशिक कार्यालयात रुपांतर
The transfer office in Jalgaon has now been converted into a regional office जळगाव : जळगाव उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाला शासनाने आता प्रादेशिक परीवहन कार्यालयाचा दर्जा दिला आहे. त्याबाबत अध्यादेश जारी करण्यात आला आहे. वाहनधारकांसाठी ही बाब अत्यंत दिलासादायक ठरणार आहे. शासनाने शुक्रवारी काढलेल्या अध्यादेशानुसार राज्यातील 9 उपप्रादेशिक परीवहन कार्यालयांचा दर्जा आता वाढला आहे. त्यात पिंपरी-चिंचवड, जळगाव, सोलापूर, अहमदनगर, वसई (जि. पालघर), चंद्रपूर, अकोला, बोरीवली (मुंबई) आणि सातारा येथील उप प्रादेशिक परीवहन कार्यालयांच्या दर्जामध्ये वाढ करुन प्रादेशिक परिवहन कार्यालयात रुपांतर करण्यास शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात आली.
उपायुक्तांना मिळणार सह आयुक्तांचा दर्जा
जळगावात सध्या उपप्रादेशिक परीवहन कार्यालय आहे. ते धुळे प्रादेशिक परीवहन कार्यालयाच्या अखत्यारीत आहे मात्र आता स्वतंत्र प्रादेशिक परीरवहन कार्यालय होणार आहे. महसुली विभागाप्रमाणेच राज्यातील सहा विभागीय कार्यालयातील उपायुक्तांनादेखील सहआयुक्तांचा दर्जा देण्यात आला आहे.
दरम्यान, सप्टेंबर 2022 मध्ये जळगाव उपप्रादेशिक परीवहन कार्यालयाऐवजी आता आरटीओ अर्थात प्रादेशिक परीवहन कार्यालय मंजूर केले होते. त्यानंतर मनुष्यबळ अर्थात कर्मचारी, अधिकारी नियुक्ती संदर्भात अभिप्राय शासनाने मागवले होते. त्यानुसार आता संबंधित प्रादेशिक परीवहन अधिकारी यांना उपरोक्त नमूद प्रादेशिक परीवहन कार्यालयांचे कार्यालय प्रमुख म्हणून घोषित करण्यात आले आहे. जळगाव जिल्हा मोठा व क्षेत्रफळही मोठे असल्याने चाळीसगावला उपप्रादेशिक परीरवहन कार्यालयाची निर्मिती करण्याबाबतचा प्रस्ताव होता मात्र, तो भडगावचा करण्यात होता.
वाहनधारकांचा त्रास होणार कमी
शासनाच्या निर्णयाचे सर्वप्रथम मी स्वागत करतो. या निर्णयामुळे मोठ्या वाहन चालकांना वारंवार धुळे येथे छोट्या छोट्या कामासाठी जाण्याच्या त्रास यानिमित्ताने कमी होणार आहे. तसेच जळगाव कार्यालय प्रादेशिक कार्यालय झाल्यामुळे कर्मचारी, अधिकारी यांची संख्या वाढेल, पर्यायी नागरीकांची कामे लवकर होतील. जळगावकरांच्या दृष्टीने ही आनंदाची बाब असून आम्ही शासनाचे आभार मानतो, असे जळगाव जिल्हा मोटर ड्रायव्हिंग स्कूल ओनर्स असोसिएशचे अध्यक्ष अॅड.जमील देशपांडे म्हणाले.