बलकुवेतील युवकाचा खून : दोघा आरोपींना शिरपूर पोलिसांकडून अटक
Murder of youth in Balkuve : Two accused arrested by Shirpur Police शिरपूर : किरकोळ वादातून झालेल्या मारहाणीत बलकुवे येथील तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर दोन संशयितांना शिरपूर पोलिसांनी अटक केली आहे. ज्ञानेश्वर गयबू पाटील (बलकुवा, ता.शिरपूर) असे खून झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी शहर पोलिसानी गावातील संशयीत सागर गोपाल भील (18) व अर्जुन हिरामण भील (37) यांना अटक केली. याबाबत मयताचा भाऊ रामचंद्र गयबू पाटील यांनी शनिवारी सायंकाळी शहर पोलिसात फिर्याद दाखल केली. मारहाणीची घटना सोमवार, 17 जुलै 2023 रोजी रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास बलकुवे येथे घडली होती.
डोक्यात मारला लोखंडी रॉड
मयत युवकाचा पत्नीसोबत घटस्फोट झाला असून संशयीतांनी त्याच्या पत्नीबद्दल अपशब्द वापरत अपमान केला व त्यानंतर युवक घरी आला मात्र त्यानंतरही संशयितांनी घरी येऊन शिवीगाळ करीत त्याच्याशी वाद घातला. संशयित सागर भील याने त्यास उचलून सिमेंट रस्त्यावर जोराने आपटून दिल तसेच लोखंडी पाईपने डोक्यात आणि इतर ठिकाणी बेदम मारहाण केली. मंगळवार, 18 जुलै रोजी गावात सकाळी रस्त्यात पडून बेशुद्ध झाल्यानंतर त्यास शिरपूर शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र प्रकृती खालावल्याने त्यास अधिक उपचारासाठी धुळे येथील हिरे मेडिकल रुग्णालयात हलविण्यात आले असता शुक्रवार, 21 जुलै रोजी त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक अन्साराम आसटकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गणेश कुटे करीत आहे




