एकांत माणसाला घडवतो आणि बिघडवूही शकतो

द्वारकाई व्याख्यानमाला : धुळ्याच्या प्रा.डॉ.योगीता पाटील यांचे परखड मत


भुसावळ : मोबाईलची दुनिया आभासी आहे. त्याच्या आहारी गेल्याने माणूस स्वतःला हरवून बसला. पालकांना आपल्या पाल्यांसाठी क्वालिटी टाईम देता येत नाही. मुले-मुली व्यस्त रहावी म्हणून पालक त्यांच्या हातात मोबाईल देतात मात्र एकांतात ते त्याचा वापर कसा करतात? त्यावर ते घडणे आणि बिघडणे अवलंबून आहे, असे परखड
मत धुळ्याच्या प्रा.डॉ.योगीता पाटील यांनी भुसावळात व्यक्त केले. जय गणेश फाउंडेशनने द्वारकाबाई कालिदास नेमाडे यांच्या स्मरणार्थ तीन दिवसीय ‘द्वारकाई व्याख्यानमाला’ आयोजित केली आहे. त्यात सोमवारी प्रथम पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.

यांची विचारमंचावर उपस्थिती
शहरातील अहिल्यादेवी कन्या विद्यालयात ‘उमलत्या कळ्यांचे भान आणि आत्मभान’ या विषयावर त्यांनी संवाद साधला. अध्यक्षस्थानी स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील होते. विचारमंचावर माजी नगराध्यक्ष उमेश नेमाडे, मुख्याध्यापिका मानसी कुलकर्णी, जय गणेश फाउंडेशनचे अध्यक्ष चैत्राम पवार, समन्वयक गणेश फेगडे होते. द्वारकाई व्याख्यानमाला भुसावळच्या सांस्कृतिक चळवळीचा मानदंड आहे. विद्यार्थ्यांची वैचारीक भूक भागवणारा पथदर्शी असा हा उपक्रम आहे. त्यात असलेले सातत्य बोध घेण्यासारखे आहे. सकारात्मक विचारधारा वृद्धींगत होण्यासाठी असे उपक्रम महत्त्वाचे ठरतात, अशी भावना स्नेहयात्री प्रतिष्ठानचे अध्यक्ष वीरेंद्र पाटील यांनी व्यक्त केली. सूत्रसंचालन आशिष निरखे यांनी केले.

नेमकेपणाचे झरे आटले
जग बैलगाडीच्या नव्हे जेट विमानाच्या वेगाने बदलते आहे. माहिती आणि तंत्रज्ञानाचा भडीमार इतका होतो आहे की श्वास कोंडला जातो आहे. तंत्रज्ञान विकसीत झाल्याने माहितीचे डोंगर हाती आले हे मान्य. पण नेमकेपणाचे झरे आटले आहेत. आभासी जगात गुरफटलेल्या पिढीला मी माणूस आहे हे आत्मभान आले पाहिजे, असा सल्लाही वक्ता प्रा.योगीता पाटील यांनी व्याख्यानातून दिला.

साचून ठेऊ नका, बोलते व्हा
कुटुंबात आहार, विहार, फॅशन, लाईफ स्टाईलवर जितकी चर्चा होते तितकीच ती लैंगिक शिक्षणावर होणे अपेक्षित आहे. माणसाने श्रद्धाळू असावं पण अंधश्रद्धेचा विस्तव पेटवणे थांबवावे. मुलींनी मासिक पाळी, वयात येणं या गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. पालकांना श्वास रोखून पाहणारी, ऐकणारी मुले व मुली ओळखता आली पाहिजे. मात्र, त्यासाठी कुटुंबात निकोप संवाद हवा, अशी अपेक्षा प्रा.योगीता पाटील यांनी व्यक्त केली.

आज फुलणार कवितेचा मळा
द्वारकाई व्याख्यनालेचे द्वितीय पुष्प बुधवारी आर.जी.झांबरे माध्यमिक विद्यालयात सकाळी 10 वाजता गुंफले जाईल. एरंडोलचे बालकवी पुरस्काराने सन्मानीत अ‍ॅड.विलास मोरे हे प्रमुख वक्ते असतील. ‘या बाळांनो, फुलवू कवितेचा मळा’ हा विषय ते मांडतील.







मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !