यावल पोलिसांची धडक कारवाई : गावठी दारूच्या चार हातभट्ट्या उद्ध्वस्त

Yaval police strike action : four village liquor kilns destroyed यावल : यावल पोलिसांच्या पथकाने एकाच वेळी तालुक्यात चार ठिकाणी धाडी टाकत गावठी हातभट्टीच्या भट्ट्या उद्ध्वस्त केल्या. अंजाळे, पिंप्री, सावखेडासीम व निंबादेवी धरण परीसरात कारवाई करीत तब्बल 42 हजार रुपयांचा मुद्देमाल नष्ट करीत चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला. या कारवाईमुळे अवैधरीत्या गावठी दारू विक्री करणार्यांच्या गोटात खळबळ उडाली.
कारवाईने उडाली खळबळ : सर्वसामान्यांमधून पोलिसांचे कौतुक
यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राकेश माणगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक विनोदकुमार गोसावी, सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार किशोर परदेशी, संदीप सूर्यवंशी, निलेश वाघ, भूषण चव्हाण सहपथकाने अंजाळे गावाजवळ तापी नदीच्या काठी गावठी हातभट्टी वर छापा टाकला. तिथून 16 हजारांचा मुद्देमाल नष्ट केला व कैलास बळीराम सपकाळे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. पिंप्री येथे तापी नदीच्या काठी पंकज रवींद्र सपकाळे हादेखील गावठी हातभट्टीची दारू गाळणी करताना आढळून आल्याने त्याच्याकडून 17 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला तर सावखेडासीम येथे आमीन नबाब तडवी हा गावठी दारू गाळणी करताना आढळल्याने त्याच्याकडून चार हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट करण्यात आला. निंबादेवी धरण परीसरात कापसिंग उर्फ डुबल्या पावरा हा देखील गावठी हातभट्टीची दारू गाळणी करताना दिसून आल्याने त्याच्याकडून पाच हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. एकूण चार ठिकाणी कारवाई करीत पोलिसांनी 42 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करून नष्ट केला.
