डंपर-क्रुझर अपघातातील मृतांची संख्या पोहोचली बारावर
जखमी बालकासह चालकाचाही अखेर मृत्यू : चिंचोलमध्ये पसरली शोककळा
फैजपूर : राखाड वाहणारा भरधाव डंपर वर्हाडींच्या क्रुझरवर आदळून झालेल्या भीषण अपघातात 12 वर्हाडी ठार झाले तर पाच प्रवासी जखमी झाल्याची
दुर्दैवी घटना यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळील मोर धरण वसाहतीजवळ सोमवारी पहाटे एक वाजेच्या वाजेच्या सुमारास घडली. या भीषण अपघाताने चिंचोल गावावर मोठी शोककळा पसरली आहे.
स्वागत समारंभातून परतताना भीषण अपघात
मुक्ताईनगर तालुक्यातील चिंचोल प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी यांच्या कन्येचा 30 रोजी विवाह समारंभ झाल्यानंतर रविवार, 2 रोजी चोपडा येथे वराकडील मंडळींनी स्वागत समारंभ (रीसेप्शन) आयोजित केल्याने चिंचोल येथील चौधरी कुटुंबातील सदस्यांसह आप्तेष्ट खाजगी वाहनांद्वारे चोपडा येथे गेले होते. कार्यक्रम आटोपल्यानंतर विविध वाहनांद्वारे वर्हाडी गावाकडे येत असताना यावल तालुक्यातील हिंगोणा गावाजवळ राख घेवून जाणारा डंपर (एम.एच.40 डब्ल्यू 7558) ने कु्रझर (एम.एच.19 सी.व्ही.1772) ला जोरदार धडक दिल्याने क्रुझरमधील 12 जणांचा मृत्यू झाला तर सहा जण गंभीररीत्या जखमी झाले. सोमवारी पहाटे 12.30 वाजेच्या सुमारास झालेल्या अपघातानंतर काही वाहतूक विस्कळीत झाली होती तर अपघातग्रस्त वाहने ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. डंपरची धडक इतकी जोरदार होती की हिंगोणा गावापर्यंत त्याचा आवाज पोहोचला तर अपघातात कु्रझरचा पूर्णपणे चुराडा झाला.





पोलिसांसह अनेकांची मदतीसाठी धाव
अपघातस्थळी पोलिस उपअधीक्षक नरेंद्र पिंगळे, यावलचे निरीक्षक अरुण धनवडे, फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक प्रकाश वानखेडे व स्थानिक ग्रामस्थांसह फैजपूरचे जफर मेंबर, सावद्याचे राजेश वानखेडे, जुगल पाटील, आकाश चोपडे, भूषण फेगडे व रीतेश बारी आदींनी धाव घेत मदतकार्य केले. सोमवारी आमदार शिरीष चौधरी यांच्यासह माजी आमदार हरीभाउ जावळे, नगरसेवक डॉ.कुंदन फेगडे, डॉ.निलेश गडे, बाळु फेगडे, उमेश फेगडे, प्रभारी नगराध्यक्ष राकेश कोलते, पंचायत समितीचे गटनेते शेखर पाटील, जि.प.सदस्य नंदू महाजन, प्रभाकर सोनवणे, प्रांताधिकारी अजित थोरबोले आदींनी नातेवाईकांचे सांत्वन केले.
भीषण अपघातात 12 जणांचा मृत्यू
या भीषण अपघातात मंगलाबाई ज्ञानेश्वर चौधरी (65), प्रभाकर उर्फ बाळू नारायण चौधरी (60), अश्लेषा उमेश चौधरी (28), रीया जितेंद्र चौधरी (14), प्रभाबाई प्रभाकर उर्फ बाळू चौधरी (40), सोनाली जितेंद्र चौधरी (34), प्रियंका नितीन चौधरी (28, सर्व रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर), सोनाली सचिन महाजन (34, चांगदेव, ता.मुक्ताईनगर), सुमनबाई श्रीराम पाटील (55) व संगीता मुकेश पाटील (40, दोन्ही रा.चिंचोल, ता.मुक्ताईनगर) यांचा जागीच मृत्यू झाला होता तर जखमींपैकी कु्रझर चालक धनराज गंभीर कोळी (चिंचोल, ता.मुक्ताईनगर) व शिवम प्रभाकर चौधरी (15, चिंचोल, ता.मुक्ताईनगर) यांचा सोमवारी सकाळी उपचार सुरू असतानाच मृत्यू ओढवला. दरम्यान, या अपघातात सर्वेश नितीन चौधरी (9, चिंचोल, ता.मुक्ताईनगर), आदिती मुकेश पाटील (निंबोल, ता.मुक्ताईनगर), सुनीता राजाराम पाटील (45, चिंचोल, ता.मुक्ताईनगर), मीना प्रफुल्ल चौधरी (30, चिंचोल, ता.मुक्ताईनगर) हे जखमी झाले आहेत.

