आमदार अपात्रता प्रकरण : एका आठवड्यात कालमर्यादा स्पष्ट करा : सरन्यायाधीश चंद्रचूड


MLA disqualification case : Clarify time limit in one week : Chief Justice Chandrachud नवी दिल्ली : शिवसेनेतून बाहेर पडलेल्या शिंदे गटातील आमदारांच्या अपात्रता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी तीव्र रोष व्यक्त करीत महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या आदेशाचा आदर करायला हवा होता, अशा शब्दात सुनावले. आता विधानसभा अध्यक्षांनी आता एक आठवड्याच्या आत कालमर्यादा स्पष्ट करण्याचे न्यायालयाने बजावले आहे.

विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर तीव्र नाराजी
शिवसेनेच्या 16 आमदारांच्या अपात्रता प्रकरणी ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील न्या.जे.बी. पारडीवाला, न्या.मनोज मिश्रा यांच्या पीठापुढे दुपारी सुनावणी झाली. आमदार अपात्रता प्रकरणी दोन्ही गटांकडून एकूण 34 याचिका प्रलंबित असून त्या एक आठवड्याच्या आत विधानसभा अध्यक्षांपुढे ठेवण्यात याव्या आणि त्यावर विधानसभा अध्यक्षांनी निश्चित कालावधीत कार्यवाही करावी, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले.





सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाच्या 11 मे च्या आदेशानंतर विधानसभा अध्यक्षांनी काय केले अशी विचारणा करीत सरन्यायाधीशांनी विधानसभा अध्यक्षांच्या कामकाजावर तीव्र रोष व्यक्त केला. याप्रकरणी पुढील सुनावणी दोन आठवड्यानंतर निश्चित करण्यात आली आहे.

जे नियमानुसार तेच करणार : राहुल नार्वेकर
जे नियमानुसार आहे तेच केले जाणार असल्याचे राहुल नार्वेकर म्हणाले. ते म्हणाले की, शिवसेना आमदारांच्या अपात्रतेच्या संदर्भात सुनावणी घेण्यात कोणतीही दिरंगाई होणार नाही तसेच त्यासाठी घाईसुद्धा केली जाणार नाही. आमदार अपात्रतेच्या कारवाईसाठी किती वेळ लागेल हे सांगता येत नाही.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !