आले आले हो… गणराज आले…!
विघ्नहर्त्याची जल्लोषात स्थापना : भुसावळात रात्री उशिरापर्यंत आरास उभारणी : शाडू मातीच्या मूर्तींनाही मागणी
भुसावळ : 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाचे भुसावळ शहर व परीसरात मंगळवार, 19 सप्टेंबर रोजी मोठ्या जल्लोषात आगमन झाले. ढोल-ताशांचा गजर तसेच पारंपरीक वाद्यांचा वापर करीत गुलाल विरहित मिरवणुकीद्वारे सार्वजनिक मंडळांनी श्रींची मूर्ती मंडळात आणली. श्रींच्या स्थापनेसाठी सकाळी 10.51 ते रात्री 9.24 पर्यंत मुहूर्त असल्याने मुहूर्तावर ठिकठिकाणी स्थापना करण्यात आली. भुसावळ शहर व बाजारपेठ हद्दीत 190 सार्वजनिक मंडळांनी अत्यंत जल्लोषत बापांची स्थापना केली तर रात्री उशिरापर्यंत सजावटीचे काम सुरू होते.
बाजारपेठेत उसळली गर्दी
शहरातील प्रमुख वर्दळीच्या जामनेर रस्त्यावरील गणेश मूर्तीची विक्रीची दुकाने थाटण्यात आल्याने खरेदीसाठी सकाळपासून भाविकांची लगबग सुरू होती. पेण, अमरावतीसह स्थानिक कलाकरांनी घडवलेल्या मूर्तींची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली तसेच शाडू मातीच्या सुमारे पाच हजारांहून तर पीओपीच्या 20 हजारांहून अधिक मूर्तींची विक्री झाल्याचे सांगण्यात आले. यंदा बाजारात सजावटीसाठी आकर्षक दिवे, लायटींग विक्रीसाठी आल्याने त्यांनादेखील मोठ्या प्रमाणावर मागणी राहिली.
मिरवणुकीत तरुणाईचा सहभाग
शहरात यंदा बाप्पांच्या स्वागत मिरवणुकीत गुलालाचा वापर तुरळक प्रमाणात आढळला. सकाळपासून सायंकाळपर्यंत शहरातील रस्ते मिरवणुकीच्या गर्दीमुळे फुलले होते तर ढोल-ताशांचा गजर, गणरायाचा जयघोष करीत लाडक्या गणरायाचे स्वागत करण्यात आले. शहरातील विविध मंडळांनी बाप्पांच्या आगमनानिमित्त काढलेल्या मिरवणुकीत यंदा तरुणींचा लक्षणीय सहभाग राहिला. ढोल-ताशांचा गजर तरुणींकडून करण्यात येत असल्याने स्त्री शक्तीच्या सामर्थ्याचे भुसावळकरांनी कौतुकही केले.
आमदार संजय सावकारे यांच्याकडे पर्यावरणपूरक गणेशाची स्थापना
भुसावळ तालुक्याचे आमदार संजय वामन सावकारे यांनी प्रोफेसर कॉलनीतील निवासस्थानी मंगळवारी पर्यावरणपूर्वक गणरायाच्या मूर्तीची स्थापना केली. आमदार यांच्या कन्या सुनिधी सावकारे हिने तिच्या हाताने गणेशाची मूर्ती तयार केली. गणपतीसाठी पत्तरवाळ्यांपासून आकर्षक सजावट करण्यात आली व या कामी आई रजनी सावकारे व भाऊ युगांक सावकारे यांनी मदत केली.
मंगळवारी आमदार संजय सावकारे यांनी सहपत्नीक गणेशाची स्थापना केली. यावेळी त्यांच्या आई सुशिलाबाई सावकारे उपस्थित होत्या. राज्यावरील संकटे दूर व्हावीत, बळीराजाला सुगीचे दिवस यावेत, सर्वांना सुख शांती लाभावी, अशी प्रार्थना यावेळी आमदारांनी केली.

