भुसावळात घरफोड्यांचा उलगडा करणार्या खाकीतील शिलेदारांचा सन्मान
भुसावळ : बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सात घरफोड्यांचा एकाचवेळी उलगडा करणार्या तसेच एमपीडीएतील पसार आरोपीबाबत कुठलीही तांत्रिक माहिती नसताना शोध लावून त्यास अटक करणार्या तसेच कर्तव्यात प्रामाणिकता ठेवून गुन्ह्यांची निर्गती करणार्या खाकीतील शिलेदारांना ‘एम्लॉयी ऑफ द मंथ’ पुरस्काराने पोलीस उपअधीक्षक कार्यालयात सन्मानीत करण्यात आले. पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांच्या संकल्पनेतून राबवण्यात येत असलेल्या उपक्रमामुळे पोलीस कर्मचार्यांचा कामाप्रती उत्साह वाढला आहे. पोलीस उपअधीक्षक कार्यालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या गुन्हे आढावा बैठकीत पाच कर्मचार्यांचा रोख पुरस्कार व सन्मानपत्र देवून सन्मान करण्यात आला.
या कर्मचार्यांचा गौरव
शहर पोलीस ठाण्याचे नाईक सोपान पंडित पाटील, बाजारपेठचे कॉन्स्टेबल प्रशांत रमेश परदेशी, भुसावळ तालुक्याच्या महिला नाईक राणी विष्णू परदेशी, नशिराबादचे हवालदार शिवदास चैत्राम चौधरी, शहर वाहतूक शाखेचे हवालदार अजय लक्ष्मण भोंबे यांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कर्मचार्यांनी अनुक्रमे एमपीडीएतील पसार आरोपीला अटक, बाजारपेठ पोलीस ठाणे हद्दीतील सात घरफोड्यांची उकल, गुन्ह्यातील मुद्देमालाची निर्गती, ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह तसेच पेड-अनपेड केसेस जास्त केल्याने त्यांच्या कार्याची दखत घेत त्यांना सन्मानीत करण्यात आले. यावेळी पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, बाजारपेठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, शहर निरीक्षक गजानन पडघण, तालुका निरीक्षक बबन जगताप, सहाय्यक निरीक्षक रामेश्वर मोताळे, वाहतूक शाखा सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.
