ईद मिलादची मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दुसर्या दिवशी
सावदा शहरातील मुस्लिम बांधवांचा स्तुत्य निर्णय
Eid Milad procession on the second day of Anant Chaturthi सावदा : गणेश उत्सव विसर्जन मिरवणूक व जैन धर्मियांच्या पर्यूषण पर्वाची सांगतासह मुस्लिम बांधवांचा ईद मिलादची मिरवणूक असे तिघे सण उत्सव एकच दिवशी म्हणजे गुरुवार, 28 सप्टेंबर रोजी येत असल्याने जातीय सलोखा अबाधीत राहण्यासाइी शहरातील मुस्लिम बांधवांनी हिंदू-धर्माच्या धार्मिक भावनेचा आदर करून ईद मिलादची मिरवणूक अनंत चतुर्थीच्या दुसर्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला. सावदा शहरातील जामा मस्जिद ट्रस्ट व समस्त मुस्लिम बांधवांनी घेतलेल्या या निर्णयाचे कौतुक होत आहे.
निर्णयाचे सर्वत्र कौतुक
तीनही सण आपापल्या धर्मातील प्रत्येकासाठी पवित्र असल्याने सावदा शहरात हिंदू-मुस्लीम एकता टिकून राहावी तसेच शहरात बंधूभाव टिकून राहावा, आणि सर्वत्र सामाजिक ऐक्य आबाधीत ठेवण्यासाठी हा निर्णय मुस्लीम समाज बांधवांनी घेतला आहे. ईद-ए-मिलादनिमित्त काढण्यात येणारा जुलूस गुरुवार, 28 सप्टेंबर ऐवजी शुक्रवार, 29 सप्टेंबर रोजी काढण्यात येईल. स्तुत्य निर्णय सावदा पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक जालिंदर पळे यांना सोमवारी निवेदन देण्यात येवून कळवण्यात आला. प्रसंगी सावदा नगरपरीषदेचे मुख्याधिकारी किशोर चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक विनोद खांडबहालेसह शहरातील जामा मस्जिदचे ट्रस्ट, नगीना मस्जिद ट्रस्ट, गोसिया मस्जिद ट्रस्ट व मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.


