फैजपूरचे ऐतिहासिक जागृत श्री सिद्धीविनायक गणेश मंदिर
फैजपूर : पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या पदस्पर्शानेपावन झालेले व त्यांनीच जीर्णोद्धार केलेले येथील धाडी नदी तीरावर असलेले श्रीक्षेत्र गणपती वाडी देवस्थान पंचक्रोशीत प्रसिद्ध जागृत आहे. फैजपूर परीसरातील हे गणपती मंदिर 500 वर्षे पुरातन आहे. नवसाला पावणारा गणपती अशी ख्याती असलेल्या गणपती वाडी देवस्थानातील स्वयंभू श्रीमूर्ती ही शेंदूरचर्चित एकमेव अशी विलोभनीय आहे.
सिद्धविनायक सिद्धी दाता म्हणून भाविकांची या देवस्थानावर अढळ श्रद्धा आहे. या देवस्थानात संकटी चतुर्थी, अंगारकी चतुर्थी तर गणेश चतुर्थीपासून 10 दिवस अनंत चतुर्थीपर्यंत भाविकांची अलोट गर्दी उसळते. या व्यतिरिक्त सुद्धा भाविकांची वर्दळ नेहमीच या देवस्थानात सुरू असते. संतश्री खुशाल महाराज संजीवनी मंदिर आहे. या बरोबरच शनीमंदिर, उत्तरमुखी हनुमान मंदिर, महादेव मंदिर व एकमेव संतोषी माता मंदिर या परीसरात आहे.
संरक्षक भिंत सुविधा व्हावी
श्री क्षेत्र गणपतीवाड़ी देवस्थानाला महाराष्ट्र शासनातर्फे तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. तीर्थक्षेत्र विकास निधीतून भक्तनिवास, सिमेंट रस्ते, पथदिवे, सहा शौचालय अशी विकासकामे करण्यात आलेली आहे तसेच लहान मुलांसाठी खेळणी न.पा.प्रशासनातर्फे लावलेली आहेत. गणपतीवाडी विकासासाठी न.पा. प्रशासन सतत सहकार्य करीत असते मात्र या विकासप्रसंगी पूर्वापार असलेल्या श्री गणेशमूर्ती विसर्जन सुविधेकडे दुर्लक्ष झाले आहे. ही सुविधा पुन्हा उपलब्ध करून मिळावी तसेच नदीपात्राकडून संरक्षक भिंत बांधकाम व्हावे, अशी भाविकांची मागणी आहे. मंदिराचे व्यवस्थापन उमेश गुजराथी यांच्याकडे आहे.
