नोकरी करणारे नोकरदार न होता नोकरी देणारे उद्योजक व्हा : अॅड.रोहिणी खडसे
Instead of being an employee, become an entrepreneur who provides employment : Adv. Rohini Khadse मुक्ताईनगर : यशस्वीरीत्या व्यावसायीक तांत्रिक शिक्षण आत्मसात करून कुशल तंत्रज्ञ बनल्याने आता तुम्हाला औद्योगिक क्षेत्रात नोकरीच्या असंख्य संधी उपलब्ध आहेत. बहुसंख्य विद्यार्थ्यांचा कल हा नोकरी करण्याकडे असतो. नोकरीत जबाबदारी कमी, पगार जास्त आणि वयाच्या 58 वर्षापर्यंत फारसा ताण न घेता नोकरी करता येते असा समज आहे मात्र नोकरी करण्यापेक्षा स्वतः चा उद्योग सुरू करून उद्योजक व्हा व नोकरी करणारे न बनता नोकरी देणारे व्हा, असा सल्ला राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष अॅड.रोहिणी खडसे यांनी येथे दिला.
मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी संचलित कै. ग. सु. वराडे औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुक्ताईनगरतर्फे 2022-2023 वर्षत उत्तीर्ण विद्यार्थ्यांना पदवीप्रदान समारंभात त्या बोलत होत्या.

यांची व्यासपीठावर उपस्थिती
यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष नारायणराव चौधरी, संचालक आर.एम.खाचणे, पुरुषोत्तम महाजन, जळगावचे उद्योजक अरुण बोरोले, चंद्रकांत बेंडाळे , प्राचार्य सुजीत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. अॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की, तुम्हाला ज्या गोष्टीचे ज्ञान आहे, रुची आहे त्या क्षेत्रात उद्योग सुरू करा. त्यासाठी एक दोन वर्षे नोकरी करून अनुभवी व्हा आणि त्यानंतर उद्योजक होण्यासाठी झोकून द्या. तुम्हाला ज्या क्षेत्रात उद्योग करायचा आहे, त्या क्षेत्राच्या प्रत्येक बारीक-सारीक गोष्टीचे ज्ञान मिळवा व उद्योग सुरू केल्यानंतर कुठल्याही कामाची लाज न बाळगता काम करण्याची तयारी ठेवा. जिद्द, मेहनत, संयम व चिकाटीच्या जोरावर उद्योजकतेत नक्कीच यशस्वी होता येते, असे खडसे म्हणाल्या.

