बोदवड तालुक्यात मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान ; घरांमध्ये शिरले पाणी

अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी शेतीच्या बांधावर जाऊन केली नुकसानीची पाहणी


बोदवड : बोदवड तालुक्यातील कुर्‍हा हरदो, धोनखेडा, लोणवाडी परीसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने या परीसरातील शेती शिवार, घरांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. यापूर्वी जुलै महिन्यात या परीसरात अशाचप्रकारे अतिवृष्टी होऊन शेतीचे, घरांचे मोठे नुकसान झाले होते. शुक्रवारी रात्री या परीसरात झालेल्या ढग फुटीसदृश्य पावसाने पुन्हा नुकसान झाल्याने शेतकर्‍यांची चिंता वाढली आहे. अनेक ठिकाणच्या शेतात पाणी साचले असून घरांमध्ये पाणी शिरल्याने संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड.रोहिणी खडसे यांनी कुर्‍हा हरदो, लोणवाडी, धोनखेडा येथे शेतीच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त शेतीची, घरांची पाहणी करीत शेतकर्‍यांना धीर दिला.

मोर्‍या बंद झाल्याने शेतांचे नुकसान
काही ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेल्या रस्त्यांवरील मोर्‍या बंद झाल्यामुळे, मोर्‍यांच्या अपूर्ण बांधकामामुळे पाणी शेतात शिरल्याने शेतांचे नुकसान झाले. अ‍ॅड.खडसे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता बेनकुळे यांच्या सोबत दूरध्वनीवरुन चर्चा केली असता त्यांनी एक महिन्याच्या आत मोर्‍यांचा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. रोहिणी खडसे यांनी बोदवड तहसीलदार मयुर कलसे यांचीही तहसील कार्यालयात भेट घेऊन नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी केली तसेच जुलै महिन्यात झालेल्या नुकसानीची मदत मिळण्यासाठी तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावर शासनाकडे पाठपुरावा करण्याबाबत चर्चा केली.

शासनाकडे मदतीची मागणी करणार
अ‍ॅड.रोहिणी खडसे म्हणाल्या की,आधीच दुबार पेरणीमुळे शेतकरी कर्जबाजारी झाला असून आता अतिवृष्टीसदृश्य पाऊसामुळे पुर्णपणे खचला आहे. सरकारने शेतकरी बांधवांना तत्काळ मदत उपलब्ध करून द्यावी याबाबतची जिल्हाधिकारी यांच्या ार्फत शासनाकडे करण्यात येईल, असेही त्या म्हणाल्या. यावेळी बाजार समिती उपसभापती ज्ञानेश्वर पाटील, तालुकाध्यक्ष प्रशांत (आबा) पाटील, रामदास पाटील, विजय चौधरी, भागवत टिकारे, वामन ताठे, भरतअप्पा पाटील, प्रदीप बडगुजर, प्रफुल पाटील, शाम सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, शेतकरी बांधव उपस्थित होते.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !