भुसावळात श्री विसर्जनासाठी पोलिस प्रशासन सज्ज : मिरवणुकीवर ड्रोनची नजर
मिरवणूक मार्गाची डागडूजी ; सीसीटीव्हीसह पथदिव्यांमुळे गैरसोय टळणार ; संकलीत निर्माल्याची शास्त्रोक्त विल्हेवाट होणार
भुसावळ : 14 विद्या व 64 कलांचा अधिपती असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाला निरोप देण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे. भुसावळ पालिकेने मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीसह पथदिव्यांची व्यवस्था केली असून खड्डेमय रस्त्यांना डांबराचा मुलामाही दिला आहे. शहरातील तापी नदी काठावर गुरुवारी दिवसभरात श्री विसर्जन होणार आहे. रात्री 12 वाजेपर्यंत विसर्जन चालणार असल्याने नदीकाठी पालिकेने प्रखर दिव्यांची तसेच पट्टीच्या पोहणार्यांची व्यवस्था केली आहे. दरम्यान, गणेशोत्सव विसर्जनावर पोलिस प्रशासनाची करडी नजर राहणार असून मिरवणुकीवर ड्रोन कॅमेर्यांची नजर असणार आहे.
14 उपरस्ते आज राहणार बंद
श्री विसर्जन मिरवणुकीसाठी मुख्य मिरवणूक मार्गावरील नृसिंह मंदिर ते स्टेशनरोडवरील अमर स्टोअर्स पर्यंतच्या मार्गावरील तब्बल 14 उपरस्ते बॅरीकेटस् लावून बंद केले जातील. जामनेररोड, स्टेशनरोडवरील वाहतूक दुपारी तीन वाजेनंतर रात्री 12 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे तर गवळीवाडा, मामाजी टॉकीज मार्ग, आराधना कॉलनी ते टिंबर मार्केटला जोडणारे रस्ते पूर्ववत सुरू असतील. विसर्जन केल्यानंतर मोठ्या वाहनांना थेट यावलरोड, जळगावरोडवर, महामार्गावरुन नाहाटा चौफुलीमार्गे शहरात जाता येणार आहे. मिरवणूक मार्गावरील शाळा नंबर पाचकडे जाणारा, भास्कर मार्केट, शनीमंदिर वॉर्डाला जोडणारे तीन रस्ते, अप्सरा चौकातून व्ही.एम.मंदिर वॉर्ड मार्ग, गणेश मॉलपासून शनी मंदिर वॉर्डला जोडणारा वखार मार्ग, मरीमाता मंदिर, विठ्ठल मंदिर वॉर्डाला जोडणारा, जामा मशिद लक्ष्मी चौकातील राम मंदिर वॉर्ड व खाल्लमा दर्गा भागाला जोडणारे दोन्ही मार्ग बंद असतील. सराफ बाजारातून ओसवाल पंचायती वाडा, भजे गल्लीला जोडणारा मार्ग, जनता टॉवरपासून इस्कॉन मुरलीधर मंदिराला जोडणारा मार्ग बंद असतील.
दुपारी 12 नंतर वाहतूक बंद : बसस्थानकाचे स्थलांतर
जामनेररोड व स्टेशनरोड हे दोन्ही मार्ग दुपारी 12 वाजेनंतर मोठ्या वाहतुकीसाठी बंद करण्यात येतील व दुचाकीसह पादचार्यांनाच या माार्गावरून प्रवेश असेल तर तापी पुलाकडून विसर्जन करण्यासाठी जाणारा यावलरोड मार्ग वाहतुकीसाठी खुला असेल. या रस्त्यावरुन यावल, फैजपूर, सावदा, रावेर आदी शहरांकडे जाणारी व येणारी वाहतूक पूर्वीप्रमाणे सुरळीत असेल. शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे स्टेशनरोड व जामनेर रोडवरील अवजड वाहनांसाठी वाहतूक बंद राहणार आहे. यामुळे एस.टी.बसस्थानकाचे बुधवारी सकाळी 11 वाजेनंतर रात्रीपर्यंत वरणगाव रोडवरील एसटी डेपोमध्ये स्थलांतर केले जाणार आहे. शहरात येणार्या व जाणार्या सर्व बसेस महामार्गावरुन वरणगावर ोडमार्गे डेपोत येतील व त्याच मार्गाने महामार्गावर जातील.
मुख्य मिरवणुकीत 41 मंडळांचा सहभाग
भुसावळ शहरातील नृसिंह मंदिराजवळून मुख्य मिरवणुकीला दुपारी तीन वाजेच्या सुमारास सुरूवात केली जाईल तर मुख्य मिरवणुकीत 41 मंडळे सहभागी होतीत. श्री मिरवणूक शांततेत पार पडण्यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी कृष्णात पिंगळे यांनी बंदोबस्ताचे काटेकोर नियोजन केले आहे तर पालिकेच्या वतीने मुख्याधिकारी महेश वाघमोडे यांनी सुविधा पुरवण्याचे नियोजन केले आहे. वीजपुरवठा खंडित होणार नाही यासाठी वीजकंपनीचे अधिकारी व कर्मचारी दिवसभर तळ ठोकून असतील. श्री विसर्जन मार्गावरील सराफ बाजारातील जामा मशीद ताडपत्रीने झाकण्यात आली आहे.

निर्माल्याचे दान करण्याचे आवाहन
तापी पात्रात निर्माल्य टाकल्याने जलप्रदूषण होत असल्याने ते रोखण्यासाठी राहुल नगराजवळ पालिकेतर्फे निर्माल्य संकलन करण्याची व्यवस्था केली आहे तर साईजीवन सुपर शॉपतर्फेही ही करण्यात आली आहे व संकलीत निर्माल्याची शास्त्रोक्त पध्दतीने विल्हेवाट लावली जाणार आहे. दरम्यान, भाविकांना नदीपात्रात जाण्यास मनाई असून श्रींची आरती झाल्यानंतर मूर्ती तैनात जीवन रक्षकाकडे द्यावी लागणार आहे. भाविकांसाठी तापी नदी काठावर वैद्यकीय सुविधेची व्यवस्था करण्यात आली आहे.
450 पोलिस अधिकारी व कर्मचार्यांचा बंदोबस्त
गणेशोत्सव श्री विसर्जन मिरवणुकीसाठी पोलिस प्रशासनाने काटेकोर बंदोबस्त नेमला आहे. त्यात दोन पोलीस अधीक्षकांसह 21 दुय्यम अधिकारी व राज्य राखीव दल व दंगा काबूचे प्रत्येकी एक प्लाटून, पोलिस मुख्यालय एक स्ट्रायकींग प्लाटून, 251 पोलिस कर्मचारी, 205 होमगार्ड, वनविभागाचे 10 गार्ड, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे दहा कर्मचारी, 55 निवृत्त पोलिस कर्मचारी डोळ्यात तेल घालून खडा पहारा देणार आहेत.
