भुसावळ तालुक्यात अवकाळी पावसामुळे कापसाला फटका : तूरीचे नुकसान


Cotton hit by unseasonal rains in Bhusawal taluka : Damage to thuri भुसावळ : शहरासह परीसरात गेल्या दोन ते तीन दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू असल्याने शेतकर्‍यांच्या कापसासह तुरीला मोठा फटका बसला आहे तर पाऊस आणखी काही बरसत राहिल्यास केळीला देखील मोठा फटका बसण्याची भीती व्यक्त होत आहे. अवकाळी पावसामुळे वेचणीला आलेला कापूस भिजला असून फुलोर्‍यावर आलेले तुरीचे पीक जमीनदोस्त झाले आहे. हाता तोंडाशी आलेला घास अवकाळीने हिरावल्याने शेतकरी अस्मानी संकटात सापडला आहे.

194 हेक्टरवर नुकसान
गेल्या दोन दिवसात अवकाळीने पावसाच्या तडाख्याने वेचणीला आलेला कापूस पाण्यात भिजला असून शेतकर्‍यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावला आहे. भुसावळ तालुक्यात 194 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. अवकाळी पावसाने शेती पिके व फळ पिकांच्या झालेल्या नुकसानीबाबत पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी प्रशासनाला दिलेे आहे. अवकाळी पावसामुळे भार वाढल्याने तुर पिकाने लोटांगण घातले आहे. रब्बी हंगामातील जेमतेम जमिनीवर डोकावणार्‍या हरभरा पिकाला अतिरिक्त पाणी झाल्याने हे पीक खुरटले. भाजीपाला उत्पादक शेतकर्‍यांचाही अवकाळी पावसाने घात केला. आकस्मिक अवकाळी पावसाने शेतकर्‍यांची चहू बाजूने कोंडी झाली आहे. रविवारी मध्यरात्रीनंतर आलेल्या पाऊस पिकांसाठी संजीवनी ठरल्याचे दिसून येत होते परंतु सलग दुसर्‍या दिवशीही पाऊस आलेल्या पावसाने शेतकर्‍यांचे नुकसान झाले.


वेचणीवरील कापसाला फटका
कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, सलग दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसाने अंदाजे 194 हेक्टर जमिनीचे नुकसान झाल्याची माहिती आहे. सर्वात जास्त फटका ज्वारी, मका, तूर व वेचनीला आलेल्या कापसाला बसला.

पंचनाम्यांचे जिल्हाधिकार्‍यांचे आदेश
अवकाळी पावसाच्या तडाख्यात झालेल्या शेत पिके व फळ पिकांच्या नुकसानीचे पंचनामे व सर्वेक्षण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी संबंधित यंत्रणेला दिलेत आहेत. पीक नुकसानीचे पंचनामे करून तालुकास्तरावरील संयुक्त स्वाक्षरीची अंतिम अहवाल सादर करण्याच्या आदेश सुद्धा देण्यात आलेला आहे.

वातावरण बदलाने आजाराचे रुग्ण वाढले
सलग दोन दिवस पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. पावसामुळे थंडीत वाढ झाली असून गेल्या दोन-तीन दिवसापासून दिवसभर धुके पडल्याचे दिसून येत आहे. आरोग्यासाठी हिवाळा ऋतू लाभदायक असतो मात्र ढगाळ वातावरण पाऊस आणि वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे.वातावरणातील बदलामुळे विविध आजारांच्या रुग्णात वाढ झाली आहे. विशेषतः बालकांना सर्दी, खोकला, ताप, दमा, न्युमोनिया, मोठ्यांमध्ये वाढलेला संधीवाताचा त्रास तर ज्येष्ठांमध्ये कंबर दुखी मणक्याचे आजार बळावले आहेत.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !