24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षणासाठी कायदा पारीत होणार ! : भुसावळात मनोज जरांगे पाटील
जीव गेला तरी आंदोलन मागे नाहीच : ओबीसी नेते छगन भूजबळांना सोडणार नसल्याचा इशारा
By December 24, the law will be passed for the reservation of Marathas ! : Manoj Jarange Patil in Bhusawal भुसावळ : मराठा समाजाच्या मुलांसाठी व येणार्या पिढीसाठी आरक्षण गरजेचे असून त्यासाठी आता माझा जीव गेला तरी मागे हटणार नाही मात्र त्यासाठी तुमची साथ मोलाची असल्याचे प्रतिपादन मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी सोमवारी दुपारी नाहाटा चौफुलीवर आयोजित छोटेखानी सभेत केले. ते म्हणाले की, आरक्षण मिळण्यासाठीचा लढा आता अंतिम टप्प्यात असून सरसकट मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी 24 डिसेंबरपर्यंत आता कायदा पारीत होणार आहे त्यामुळे शांतता राखा, असे आवाहनही त्यांनी समाजबांधवांना केले. ओबीसी नेत्याच्या भाषणाकडे दुर्लक्ष करा, त्यांच्यासाठी मी खंबीर आहे, त्यांना मी पाहून घेईल, असा सज्ज इशारा त्यांनी छगन भूजबळ यांचे नाव न घेता दिला.
फुलांची उधळण करीत जंगी स्वागत
मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी महाराष्ट्रभर दौर्यावर निघालेले जरांगे पाटील सोमवार, 4 रोजी दुपारी दोन वाजता भुसावळ येथे आले असता भुसावळ सकल मराठा समाजाच्या वतीने त्यांचे नाहाटा चौफुलीवर जंगी स्वागत करण्यात आले. अनेक गाड्यांचा ताफा घेऊन आलेल्या पाटलांवर फुलांची ऊधळण करुन महिीलांनी औक्षण केले. ढोल-ताशे व शिवरायाच्या पोवाड्यांनी वातावरण शिवमय झाले. यावेळी छोटेखानी सभेत त्यांनी हजारोंच्या जनसमुदायाला मार्गदर्शन केले.


हीच ती वेळ…! : ठामपणे पाठीशी उभे रहा
यावेळी मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आरक्षण नसलेल्यांचा पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याची हीच ती वेळ आहे. आपण मराठा समाजाला आरक्षण मिळवून देणार असून त्यासाठी सगळ्यांची साथ मोलाची आहे. विदर्भ व खान्देशातील मराठा बांधवांना आरक्षण असून त्यांनी आता आरक्षण नसलेल्या मराठा समाजबांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहावे, असेही ते म्हणाले.
भुजबळांना निपटून घेणार : तुम्हाला नादाला लागू नको
जरांगे पाटील म्हणाले की, मराठा समाजाने कुठल्याही नेत्याच्या नादाला लागू नये. ही लोक आपल्यात फूट पाडतील, यांच्यापासून चार हात लांबच रहा आणि त्या ओबीसी नेत्याचे ऐकू नका, असेही त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळ यांचे नाव न घेता सुनावले. मी त्या नेत्याला बघून घेतो, वठणीवर आणतो, कारण हा नेता जातीवाद करतो त्यामुळे त्याला मी सोडणार नाही, पार उलटा-पालटा करतो, असे त्यांनी म्हणतात उपस्थितांनी जोरदार टाळ्यांचा कडकडाट केला.
तुम्ही रक्ताचे आहात, एकत्र या
जरांगे पाटील म्हणाले की, जीव गेला तरी मी आंदोलन मागे घेणार नाही. तुम्ही माझ्या पाठीशी उभे रहा. मराठ्यांच्या लेकरांच्या भविष्याचा प्रश्न आहे. आज नाही तर कधीच नाही. जे रक्ताचे नाहीत ते आपल्याविरुध्द आहे. तुम्ही रक्ताचे असल्याने आतातरी एकत्र या. मराठ्यांच्या भविष्यासाठी एकत्र या. पुढची पिढी तुमचे उपकार विसरणार नाही. घरा-घरात मराठे एकत्र करा. पुढच्या वेळी भुसावळला संपूर्ण एक दिवस देईल तेव्हा पाच किलोमीटरपर्यंत दुतर्फा रांगा लागायला हव्यात, अशी ताकद सरकारला दाखवा, असे आवाहन पाटील यांनी केले.
चार तास उशिराने आगमन
नियोजित वेळेपेक्षा चार तास उशिराने अर्थात सोमवारी दोन वाजता जरांगे पाटील यांचे जामनेर येथून मुक्ताईनगरकडे जाताना भुसावळात आगमन झाले. समाजबांधवांनी जल्लोषात ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. कारगील युध्दात शहिद झालेल्या राकेश शिंदे यांच्या स्मारकाचे दर्शन घेऊन व्यासपीठावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर जरांगे पाटील यांनी भाषणाला सुरूवात केली. सकल मराठा समाज व खान्देश कुणबी समाजाच्या वतीने भलामोठा हार घालून जरांगे यांचे स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात शहरातील मराठा भगिनी कल्पना भोकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना ‘साहेब भुसावळचा सकल मराठा आलेले उत्तर पुढार्यांना परत देणार’अशा आशयाचे रक्ताने लिहिलेले पत्र देत पाठींबा दर्शवला.
यांची होती उपस्थिती
सकल मराठा समाज अध्यक्ष रवी ढगे, माजी नगरसेवक राजेंद्र आवटे, अॅड.तुषार पाटील, अॅड.जास्वंदी भंडारी, अॅड.सहदेव पाटील, राष्ट्रवादी पवार गटाचे रवींद्र पाटील, साकेगाव सरपंच आनंदा ठाकरे, मनीष सारंग पाटील, मुकेश गुंजाळ यांच्यासह मराठा समाजबांधवांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.





