लोकसभा निवडणुकीसाठी भुसावळात एका मतदान केंद्राची वाढ
प्रांतांनी घेतली बैठक : संवेदन केंद्रांचा डाटा काढण्याच्या सूचना
भुसावळ : भुसावळ लोकसभा मतदार संघासाठी यापूर्वी 313 मतदान केंद्र होते मात्र त्यात एका भुसावळच्या मुस्लीम कॉलनीत एक केंद्र वाढल्याने केंद्राची संख्या 314 वर पोहोचली आहे. सर्व मतदान केद्रांना संबंधित पोलिस अधिकार्यांनी त्याच्या कार्यक्षेत्रात भेटी देऊन अहवाल द्यावा, अशा सूचना भुसावळचे प्रांताधिकारी तथा प्रशासक जितेंद्र पाटील यांनी केल्या. प्रांताधिकारी कार्यालयात मंगळवार, 19 रोजी दुपारी पोलिस प्रशासनाह बीएसएनएल, पालिका, एसटी महामंडळ, राज्य उत्पादन शुल्क, पंचायत समिती आदी विभागातील प्रमुख पदाधिकार्यांची बैठक घेत त्यांनी सूचना केल्या.
यांची बैठकीला उपस्थिती
आढावा बैठकीस भुसावळ तहसीलदार निता लबडे, मुख्याधिकारी महेश वाघमोडे, शहरचे पोलिस निरीक्षक गजानन आव्हाड, बाजारपेठ निरीक्षक बबन आव्हाड, वरणगावचे सहायक निरीक्षक भरत चौधरी, एस.टी.चे अधिकारी, बीएसएनएलसह विविध कार्यालयातील अधिकारी, त्यांचे प्रतिनिधी हजर होते.


मतदान केंद्रांना द्याव्यात भेटी
प्रांताधिकारी यांनी बैठकीत सांगितले की, आगामी काळात लोकसभेची निवडणूक होत असून त्या अनुषंगाने प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील मतदान केद्रांची माहिती सादर करण्यात यावी तसेच त्या-त्या पोलिस ठाण्याच्या अंतर्गत येत असलेल्या मतदान केद्रांना भेटी द्याव्यात, त्या मतदान केंद्रात काय त्रृटी आहे, गेल्या वेळेस किती मतदान केंद्रे ही संवेदनशील होती, आता त्यात काही वाढ झाली आहे का, याचा आढावा घेऊन अहवाल तातडीने सादर करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. महसूल विभागाचे अधिकारी सोबत राहून संयुक्त भेटी द्यायच्या असून प्रत्येक शासकीय कार्यालयातील एक अधिकारी हा निवडणूक काळात समन्वयक म्हणून राहणार आहे, असेही ते म्हणाले. यंदा 50 टक्के मतदान केंद्रे वेबला जोडण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. बीएसएनएलच्या अधिकार्यांनी प्रत्येक मतदान केद्रांना भेटी देऊन इंटरनेटची रेंज येते का नाही, याचा आढावा घेण्याचे निर्देशही त्यांनी दिले.





