एक लाखांची लाच घेताना जळगावातील कंत्राटी वायरमन एसीबीच्या जाळ्यात
A contract wireman in Jalgaon caught in ACB’s net while accepting a bribe of Rs जळगाव : वीज चोरी प्रकरण मिटवण्यासाठी एक लाखांची लाच घेताना कंत्राटी वीज वायरमनला जळगाव एसीबीने मंगळवारी रात्री सापळा रचत रंगेहाथ अटक केल्याने वीज कंपनीच्या वर्तुळातील लाचखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. प्रशांत विकास जगताप (33) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
असे आहे लाच प्रकरण
जळगावातील एका भागातील 53 वर्षीय तक्रारदाराने घराचे बांधकाम नुकतेच पूर्ण केले आहे. त्यांनी घराला वीज मीटर बसवण्यासाठी यापूर्वीच अर्ज केला असलातरी त्यांना मीटर देण्यात आले नव्हते मात्र त्यांनी खांब्यावरून वीज प्रवाह घेतल्याने वीज कंपनीच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आला. चार लाख 60 हजार रुपये दंडाची रक्कम भरली तरच वीज मीटर कनेक्शन मिळेल, असा निरोप कंत्राटी वायरमन यांच्यामार्फत देण्यात आल्यानंतर तक्रारदार यांनी कंत्राटी वायरमन यांची भेट घेऊन त्यांच्याशी बोलणी केली असता एक लाख साठ हजार रुपयांमध्ये प्रकरण मिटवण्याचे आश्वासन देत लाच मागण्यात आली व एक लाख 40 हजार रुपये लाच देण्याचे ठरल्यानंतर सापळा रचण्यात आला. लाचेतील पहिल्या टप्प्यात मंगळवारी रात्री दहा वाजता एक लाखांची लाच देण्याचे ठरले कंत्राटी वायरमन प्रशांत जगताप यांना जळगावच्या टॉवर चौकात लाच स्वीकारताच अटक करण्यात आली.


अधिकार्यांच्या वाढल्या अडचणी
वीज ग्राहकांकडून लाच मागणी प्रकरणात अन्य काही अधिकारी व कर्मचारीदेखील अडकण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. एसीबीकडून आता लाचखोर कर्मचार्याच्या जवाबाअंती अनेक बाबी समोर येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
यांनी केला सापळा यशस्वी
जळगाव एसीबीचे पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख, पोलिस निरीक्षक अमोल वालझाडे व एन.एन.जाधव, एएसआय दिनेशसिंग पाटील, सुनील वानखेडे, बाळू मराठे, राकेश दुसाने, सुरेश पाटील, रवींद्र घुगे, महिला हवालदार शैला धनगर, किशोर महाजन, प्रदीप पोळ, प्रणेश ठाकूर, अमोल सूर्यवंशी, सचिन चाटे आदींच्या पथकाने हा सापळा यशस्वी केला.
