यावल रस्ता टाकणार कात : मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते काँक्रिटीकरण कामाचे भूमिपूजन
अनेक वर्षानंतर रस्त्याचे काँक्रिटीकरण : वाहनधारकांना दिलासा
भुसावळ (शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2026) : गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरत असलेल्या यावल रस्त्याचे लवकरच काँक्रिटीकरण होणार आहे. वारंवार होणारा रस्त्यावरील दुरुस्तीचा खर्चही या माध्यमातून टळणार असून वाहनधारकांना या माध्यमातून मोठा दिलासा मिळणार आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंतीचे औचित्य साधून मंत्री संजय सावकारे यांच्याहस्ते शुक्रवारी या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले.
लवकरच सुरू होईल काम
सीआरएफ व हायब्रीड न्युईटी प्रकल्प योजनेतून शहरातील यावल रोडवरील जूना टोलनाका ते गांधी पुतळा या मार्गाच्या काँक्रीटीकरण केले जात आहे. या मार्गावर काँक्रीटीकरणासोबत गटारी, रुंदीकरण आदी कामे होतील. राज्य सीमा विटवा भुसावळ, जामनेर, फत्तेपुर, मोताळा फाटा, पिंपळगाव राजा खामगाव राज्य मार्ग 44 चार किमी 46/500 ते 47/800 अंतर्गत या रस्त्याचे काम केले जात आहे. यापूर्वी राहूल नगर परिसरात खोलगट भागात रिटीनींग वॉलचे काम करण्यात आल्याने भराव करुन हा रस्ता समतल होईल.
यांची होती उपस्थिती
यावेळी प्रभारी नगराध्यक्षा शैलजा नारखेडे, नगरसेवक गिरीश महाजन, भाजपचे गटनेते युवराज लोणारी, उद्योजक मनोज बियाणी, अॅड.बोधराज चौधरी, परीक्षीत बर्हाटे, राजेंद्र आवटे, निर्मल कोठारी, आसीफ खान, पुरुषोत्तम नारखेडे, निक्की बतरा आदींसह सर्व नगरसेवक, नगरसेविका, भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.


