धुळे सायबर पोलिसांची मोठी कामगिरी : बनावट पॉलिसीद्वारे दहा लाखांचा गंडा घालणार्या कल्याणसह ठाण्यातील पाच भामट्यांना बेड्या
एक लाख 27 हजारांची रक्कम गोठवली : सहा मोबाईल जप्त तर एक लाख 48 हजारांची रोकड जप्त
Dhule Cyber Police’s Big Achievement: Five Bhamtas from Thane, including Kalyan, who swindled 10 lakhs through fake policies धुळे : धुळ्यातील सायबर पोलिसांनी बनावट पॉलिसीद्वारे दहा लाखांचा गंडा घालणार्या भामट्यांना पुण्यासह कल्याणमधून बेड्या ठोकल्या आहेत. भामट्यांनी अशाच पद्धत्तीने अनेकांना ठगवल्याचा संशय आहे. संशयिताच्या ताब्यातून एक लाख 48 हजारांची रोकड जप्त करण्यात आली आहे तर एक लाख 27 हजारांची रोकड असलेले खाते गोठवण्यात आले आहे शिवाय संशयितांचे सहा मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.
या आरोपींना अटक
अटकेतील आरोपींमध्ये मुख्य सूत्रधार प्रल्दाद गजानन वाठोडकर उर्फ संतोष वामन भोसले (नांदिवली, कल्याण), बनावट पॉलिसी एजंट अविनाश हनुमंत वांगडे (लोकमान्य नगर, ठाणे) बनावट बँक खाते धारक शिवम राजू जयस्वाल (पिसवली कल्याण), पॉलिसी डाटा पुरवणारा संशयित सागर विजय माळी (गोळेगाव, ता.जुन्नर, जि.पुणे) व बनावट बँक खाते धारक विवेक विनोद सिंग (पिसवली कल्याण) यांचा समावेश आहे.





असे आहे फसवणूक प्रकरण
अजय शिवाजी पाटील हे दहिवेल, ता.साक्री येथील रहिवासी असून ते नोकरदार आहेत. संशयिताने त्यांच्यासह साक्षीदारांना बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीचा अकाऊंट मॅनेजर असल्याचे भासवून इंडिया फस्ट लाईफ इन्सुरन्स कंपनी लि. ऐवजी आपण बजाज फायनान्स लिमिटेड कंपनीची विमा पॉलीसी घेतल्यास फिर्यादी व साक्षीदार यांना शून्य टक्के दराने प्रत्येकी पाच कोटींचे कर्ज मंजूर करून देतो व म्हणत तुम्ही दरवर्षी पाच लाख रुपयांप्रमाणे दहा वर्षात परतफेड करा, असे आमिष दाखवले. कर्ज मंजुरीबाबत बनावट पॉलिसीचे कागदपत्र देवून फिर्यादी व साक्षीदार यांची एकूण नऊ लाख 99 हजार 300 रुपयात फसवणूक केल्यानंतर धुळे सायबर पोलिसात 15 डिसेंबर 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला.
खाते गोठवले : तांत्रिक तपासानंतर संशयित ताब्यात
सायबर गुन्हे शाखेने तक्रारदार यांनी ज्या बँक खात्यात पैसे ट्रान्सफर केले ते खाते आधी गोठवले तर तांत्रिक तपासानंतर आरोपींची माहिती काढण्यात आली. आरोपी हे ठाणे, कल्याण, मुलुंड येथे मुंबईत असल्याचे कळताच टीम रवाना करण्यात आली. कल्याणच्या पिसवली गावातून विवेक विनोद सिंग व शिवम राजू जयस्वाल यांना 1 रोजी अटक करण्यात आली तर चौकशीत सूत्रधार प्रल्हाद गजानन वाठोडकर याच्या नावाचा उलगडा झाल्यानंतर पथकाने शिर्डीतून 2 रोजी त्याला बेड्या ठोकल्या तर साथीदार अविनाश हनुमंत वांगडे याच्या ठाणे येथील वर्तक नगर भागातील चाळीतून मुसक्या बांधण्यात आल्या. पाचवा संशयित सागर विजय माळी हा गोळेगाव, ता.जुन्नर येथे असल्याने त्यासही अटक करण्यात आली.
यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी ऋषिकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धनंजय व्ही.पाटील, पोलिस उपनिरीक्षक कोठुळे, जगदीश खैरनार, भूषण खलाणेकर, राजेंद्र मोरे, अमोल पाटील, दिलीप वसावे, तुषार पोतदार, प्रसाद वाघ, प्रितेश चौधरी, सुभाष वळवी, हेमंत बागले, चेतन सोनगोरे, विवेक बिलाडे, अमितेश पाटील, मनिषा वाघ, रेवती बिलाडे, प्रियंका देवरे, सोनाली श्रीखंडे, मृणालाी भावसार आदींच्या पथकाने केली.
