धुळ्यात पोलिस ठाण्यात लाच घेणार्या फौजदारासह हवालदाराची कोठडीत रवानगी
अपघातग्रस्त वाहन सोडण्यासाठी मागितली होती पाच हजारांची लाच
Constable sent to custody along with Faujdar who took bribe in police station in Dhule धुळे : अपघातग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी पाच हजारांची लाच घेताना धुळ्यातील देवपूर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षकासह हवालदाराला धुळे एसीबीने पोलिस ठाण्यातच अटक केली. हा सापळा बुधवार, 17 जानेवारी रोजी रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास यशस्वी करण्यात आला होता. या सापळ्यात पोलिस उपनिरीक्षक हरीश्चंद्र पाटील व हवालदार रवींद्र मोराणीस यांना अटक करण्यात आल्यानंतर गुरुवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.
वाहन सोडण्यासाठी लाच भोवली
35 वर्षीय तक्रारदार यांचे ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर ऊस घेवून सत्रासेन, ता.चोपडा येथून धुळेमार्गे रावळगाव साखर कारखाना येथे जात असताना देवपूर पोलिस स्टेशन हद्दीत मुंबई-आग्रा महामार्गावर सोमवार, 15 जानेवारी रोजी पलटी झाले. या घटनेबाबत मोटार अपघाताचा गुन्हा दाखल न करण्यासाठी तसेच अपघातग्रस्त वाहन सोडून देण्यासाठी लाचखोर फौजदारासह हवालदाराने बुधवार, 17 जानेवारी रोजी पाच हजारांची लाच मागितली. तक्रारदाराने तक्रार नोंदवल्यानंतर लाचेची पडताळणी करण्यात आली व बुधवारी रात्री 9.30 पोलिस ठाण्यातच दोघांना लाच स्वीकारताच अटक करण्यात आली. संशयितांना गुरुवारी धुळे न्यायालयात हजर केले असता त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली.





यांनी केला सापळा यशस्वी
हा सापळा धुळे एसीबीचे पोलिस उपअधीक्षक अभिषेक पाटील, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, पोहवा चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींच्या पथकाने यशस्वी केला.
प्रभारी अधिकार्याच्या अटकेने पोलिस वर्तुळात खळबळ
देवपूर पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सतीश घोटेकर यांची 12 जानेवारी 2024 रोजी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने अहमदनगर जिल्ह्यात बदली झाल्यानंतर प्रभारी अधिकारी म्हणून हरीश्चंद्र पाटील यांच्याकडे पदभार सोपवण्यात आला होता मात्र लाच प्रकरणात प्रभारी अधिकारीच एसीबीच्या जाळ्यात अडकल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे.
