लग्न पत्रिका वाटून परतणार्या मामा-भाच्याचा दुचाकी अपघातात मृत्यू : बोदवड तालुक्यातील घटना
Uncle-nephew dies in two-wheeler accident while returning from distribution of marriage certificate : incident in Bodwad taluka बोदवड : साळसिंगी येथील मामा-भाच्याचा दुचाकी अपघातात जागीच मृत्यू झाल्याची घटना करंजी फाट्याजवळ गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. दोघे मामा-भाचे लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेल्यानंतर अज्ञात वाहनाने दुचाकीला उडवल्याने मामा शिवाजी रामदास काळबहिले (50, रा.साळशिंगी) व भाचा ज्ञानेश्वर लक्ष्मण पाटील (35) यांचा मृत्यू ओढवला.
अज्ञात वाहनाच्या धडकेने अपघात
विवाहाची पत्रिका वाटण्यासाठी काळबहिले व पाटील हे मामा भाचे गेले असता जळगाव येथून परतीच्या प्रवासात बोदवड ते भुसावळच्या दरम्यान असणार्या करंजी फाट्याजवळ त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. हा अपघात गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला.


या अपघातात शिवाजी काळबहिले आणि ज्ञानेश्वर पाटील हे गंभीर जखमी झाले. परिसरातील ग्रामस्थांनी धाव घेऊन त्यांना ग्रामीण रूग्णालयात दाखल केले. तथापि, उपचार सुरू होण्याआधीच या दोघांची प्राणज्योत मालवली. या घटनेमुळे साळशिंगी परिसरावर शोककळा पसरली आहे. काळबहिले यांच्या पश्चात तीन मुली आहेत. अपघात प्रकरणी देविदास रामदास काळबैले यांच्या फिर्यादीवरून अज्ञात वाहन धारकाविरोधात बोदवड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहाय्यक निरीक्षक अंकुश जाधव करीत आहेत.
