भुसावळातील रोडरोमिओंवर आता पोलिसांकडून कारवाईचा ‘वरवंटा’

पहिल्याच दिवशी पाच तरुणांविरोधात कारवाई : शाळा-महाविद्यालय आवारासह खाजगी क्लासेस भागात ‘निर्भया पथका’ चा वॉच


गणेश वाघ

Action by police on roadromios in Bhusawal भुसावळ : शाळा-महाविद्यालयासह खाजगी क्लासेसमध्ये शिक्षण घेण्यासाठी येणार्‍या शहरासह ग्रामीण भागातील अल्पवयीन तरुणींसह युवतींची छेडखानी रोखण्यासाठी निर्भया पथकाकडून गुरुवार, 8 फेब्रुवारीपासून धडक कारवाईला सुरूवात झाल्याने शहरातील रोडरोमिओंच्या गोटात प्रचंड खळबळ उडाली आहे. पहिल्याच दिवशी पाच तरुणांवर कारवाई करण्यात आली तर शुक्रवारपासून नियमित कारवाई केली जाणार असल्याचे पथकाकडून सांगण्यात आले.

निर्भया पथकाकडून होणार धडक कारवाई
शहरातील शाळा-महाविद्यालयांमध्ये शिक्षणासाठी येणार्‍या अल्पवयीन तरुणींसह महाविद्यालयीन युवतींची छेडखानी रोखण्यासाठी निर्भया पथकाला धडक कारवाई करण्याच्या सूचना भुसावळचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी दिल्या आहेत. शहरातील कुठल्याही भागातून महिला-मुलींची छेडछाड झाल्याचे कळताच हे निर्भया पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचणार आहे शिवाय शहर व बाजारपेठ हद्दीतील विविध शाळा, महाविद्यालयांच्या आवारात विनाकारण उगीचच रस्त्यावर थांबून टवाळकी करणारे, रस्त्याच्या कडेला वाहने लावून उनाडकी करणार्‍यांविरोधातही या पथकाकडून कारवाई केली जाणार आहे. महाविद्यालयाच्या आवारात येणार्‍या तरुण-तरुणींचे ओळखपत्र पथकाकडून तपासले जात आहे.



रोडरोमिओंवर दाखल होणार गुन्हे
गुरुवारपासून निर्भया पथकाकडून रोडरोमिओंविरोधात मोहिम उघडली आहे. पहिल्याच दिवशी गुरुवारी सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण, पोलिस हवालदार संदीप पालवे, हवालदार विनोद वीतकर, कॉन्स्टेबल संजय वानखेडे आदींच्या पथकाने शहरातील सेंट अलॉयसीस हायस्कूल, शांती नगर तसेच तापी नगरातील के.नारखेडे महाविद्यालयाच्या परीसरात गस्त केली. यावेळी पाच तरुणांकडे महाविद्यालयाचे ओळखपत्र नसल्याने व विनाकारण हे तरुण फिरत असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांच्यावर बीपी अ‍ॅक्ट 110 व 117 नुसार कारवाई करण्यात आली. मुलगा सज्ञान असल्यास त्याच्यावर बीपी अ‍ॅक्ट अन्वये कारवाई केली जाणार आहे तर मुलगा अल्पवयीन असल्यास पोलिस ठाण्यात संबंधित मुलांच्या पालकास बोलावून समज देण्यात येणार आहे. मुलगा सज्ञान नसताना त्याच्याकडे वाहन आढळल्यास त्या संदर्भातही कठोर दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस सूत्रांनी सांगितले.

या महाविद्यालयांच्या परीसरात होणार गस्त
भुसावळ शहर व बाजारपेठ हद्दीत सहाहून अधिक शाळा-महाविद्यालय आहेत. त्यात शहर हद्दीत तापी नगर भागात के.नारखेडे महाविद्यालय, शांती नगरात प.क.कोटेचा महिला महाविद्यालय व के.नारखेडे इंग्रजी हायस्कूल तर बाजारपेठ हद्दीत दे.ना.भोळे महाविद्यालय, पु.ओं.नाहाटा महाविद्यालय व ताप्ती स्कूल आहे. या शिवाय शहरातील शांती नगर भागात सर्वाधिक खाजगी क्लासेस आहेत. पहाटे सहा वाजेपासून या भागात खाजगी क्लासेस सुरू होतात त्यामुळे टवाळखोर मंडळी सकाळपासून या भागात उभी राहत असल्याने त्यांच्यावर निर्भया पथक कारवाईचा वरवंटा फिरवणार असल्याचे सूत्रांनी सांगितले या शिवाय बसस्थानक तसेच महाविद्यालय भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेसही पथकाकडून गस्त घालण्यात येईल.

मुलींनी निर्भयपणे घ्यावे शिक्षण : पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे
शाळा, महाविद्यालयाच्या आवारात रोडरोमिओंचा धुमाकूळ थांबावा तसेच मुलींनी निर्भयपणे शाळा, महाविद्यालयात यावे या अनुषंगाने निर्भया पथकाच्या माध्यमातून गस्त सुरू करण्यात आली असल्याचे पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे म्हणाले.

आम्ही मदतीला धावून येऊ : सहाय्यक निरीक्षक रुपाली चव्हाण
शाळा-महाविद्यालय परीसर, बसस्थानक आदी ठिकाणी महिला-मुलींची छेड काढण्याच्या घटना घडतात. अनेकवेळा भीती वा बदनामीपोटी मुली, तरुणी पोलिसांत तक्रार करीत नाही त्यामुळे या रोडरोमिओंची हिंमत वाढत जाते. त्यामुळे महिला-तरुणींनी न घाबरता नजीकच्या पोलिस ठाण्यात तक्रार द्यावी किंवा टोल फ्रि क्रमांक 112 वर संपर्क साधावा, असे शहर वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलिस निरीक्षक रुपाली चव्हाण म्हणाल्या. शहरातील सर्व महाविद्यालयांच्या बाहेर निर्भया पथकाची दररोज गस्त असेल, असेही त्यांनी सांगितले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !