डोंगरकठोरा येथे शॉटसर्किटमुळे लागलेल्या आगीत दोन कुटुंब उघड्यावर
Two families exposed in fire caused by shot circuit in Dongarkathora यावल : यावल तालुक्यातील डोंगरकठोरा येथे रविवारी रात्री साडेनऊ वाजेच्या दरम्यान दोन घरांना आग लागली. या आगीत दोन्ही कुटुंबाचे सहा लाखांचे नुकसान झाले. आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा अंदाज आहे. आगीत दोन्ही घरातील रोख रक्कम, धान्य आदी माल व जीवनावश्यक वस्तू, घरांची पत्रे व महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली.
शॉर्टसर्किटमुळे लागली आग
डोंगरकठोरा, ता.यावल येथे अनिल धनराज सरोदे व दगडू गेंदु पाटील यांच्या घरात रविवारी रात्री शॉर्टसर्किटमुळे अचानक आग लागली. रात्री 9.30 वाजे दरम्यानची वेळ असल्याने आग लागल्याचे लवकर निर्दशनास आले नाही व आगीने रौद्ररूप धारण केले. आग विझविण्यासाठी यावल येथील नगरपालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले.


सहा लाखांचे नुकसान
यावेळी फायरमन कल्पेश बारी, ड्रायव्हर कैलास काटकर व शिवाजी पवार यांनी अथक परीश्रम घेत आग विझवली. या आगीत अनिल धनराज सरोदे यांचा दोन क्विंटल तूर, दोन क्विंटल भुईमूग शेंगा, रोख व रोकड आठ हजार रुपये व गृहोपयोगी वस्तू, घरांचे पत्रे, महत्वाचे कागदपत्रे असा एकूण तीन लाख 10 रुपयांवर नुकसान झाले. त्यांच्या शेजारील रहिवासी दगडू गेंदू पाटील यांचा आठ क्विंटल कापूस, दोन क्विंटल भुईमूग शेंगा, दोन क्विंटल गहू, एक क्विंटल तुरी व घरातील संसारोपयोगी वस्तू असे एकूण दोन लाख नव्वद हजारांचे नुकसान झाले तर दोघांचे एकूण सहा लाखांचे नुकसान झाले. दोन्ही कुटुंब उघड्यावर आले असून शासनाच्या वतीने दोघा कुटुंबास तत्काळ आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी होत आहे. आगीनंतर सरपंच नवाज तडवी, पोलिस पाटील राजरत्न आढाळे, तलाठी वसीम तडवी, मिलिंद कुरकुरे, कोतवाल विजय आढाळे यांनी पंचनामा केला.
