जळगावात चोरट्यांची दिवाळी तर नागरीकांचे ‘दिवाळे’
सलगच्या घरफोड्यांनी नागरीकांमध्ये घबराट ; पोलिसांच्या गस्तीलाच चोरट्यांचे आव्हान
जळगाव : दररोज होणार्या घरफोड्यांनी जळगावकर त्रस्त झाले आहेत. पोलिसांची गस्त भेदून चोर्या, घरफोड्यांचे सत्र सुरू असल्याने पोलिसही या प्रकाराने अवाक झाले आहेत तर चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात यंत्रणा अपयशी ठरत असल्याने नागरीकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. प्रजापत नगरातील घरफोड्यांची घटना ताजी असतानाच असोदा रेल्वे गेटजवळील कला वसंत नगरात दोन घर, एक दुकान तर शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये एक घर फोडण्यात आल्याने खळबळ उडाली.
चार घरफोड्यांनी पुन्हा खळबळ
असोदा रेल्वे गेटजवळील कला वसंत नगरात महादेव विठ्ठल भोळे हे घरात झोपलेले असताना रविवारी पहाटे 3.30 च्या सुमारास चोरट्यांनी खिडकीतून त्यांच्या घराच्या दरवाज्याची कडी आतून उघडत दीड हजार रुपये असलेली पर्स चोरून नेली. पहाटे 4 वाजता घरातील कुटुंबीय उठले असता दरवाजा उघडा दिसल्याने घडलेला प्रकार लक्षात आला. चोरट्यांनी पर्स घराच्या मागील बाजूला फेकून पळ काढला तर घराच्या बाहेर असलेला लाईट चोरट्यांनी काढून घेतला तर त्यांचा मुलगा लोकेश भोळे एमएच.19.डिजी.8622 या दुचाकीच्या नळ्या, वायर कापून फेकल्या व पेट्रोल चोरले. त्यानंतर कला वसंत नगरातच मूलचंद देविदास साळुंखे यांचे किराणा दुकान असून ते कुटुंबासह घरात झोपलेले असताना चोरट्यांनी घराला बाहेरून कडी लावत किराणा दुकानाचे कुलूप तोडत दुकानात प्रवेश केला, दुकानातील सामान अस्ताव्यस्त फेकत गल्ल्यातील दीड हजार रुपये रोख लंपास केले तर तिसर्या घरफोडीत साळुंखे यांच्या घरामागे राहणार्या शरद त्रंबक अहिरे यांच्याकडे झाली. अहिरे हे घराच्या वरील मजल्यावर झोपले असताना चोरट्यांनी खालील घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. किचनमध्ये ठेवलेली दीडशे रुपयांची रक्कम घेऊन त्यांनी पळ काढला. यानंतर शिवाजीनगरातील अमन पार्कमध्ये प्लॉट क्रमांक 32 मधील मोहम्मद अली इस्माईल अली सैय्यद हे धुळ्याला गेल्यानंतर घराला असलेली मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी लोखंडी कपाटातून 12 हजारांची रक्कम लंपास केली.