प्रेयसीनेच काढला दुसर्या प्रियकराच्या मदतीने पहिल्या प्रियकराचा काटा
शिंदखेडा पोलिसांकडून 36 तासात खुनाच्या गुन्ह्याची उकल : दोघे आरोपी जाळ्यात
शिंदखेडा : तालुक्यातील तावखेडा येथील खुनाची उकल करण्यात 36 तासात शिंदखेडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक दुर्गेश तिवारी व त्यांच्या सहकार्यांना यश आले आहे. प्रेयसीनेच आपल्या पहिल्या प्रियकराचा अन्य दुसर्या प्रियकराच्या मदतीने दोरीने गळा आवळून खून केल्याचे निष्पन्न झाले असून आरोपींना अटक करण्यात आली आहे तर आरोपींनी या गुन्ह्याची कबुलीही दिल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली. या प्रकरणी शीतल प्रवीण पाटील (31) व तिचा प्रियकर संभाजी यशवंत पाटील (32, तावखेडा) यांना अटक करण्यात आली आहे. आरोपींनी प्रवीण लोटन पाटील (26) याचा खून केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
ग्रामपंचायतीत शिपाई असलेल्या प्रियकराचा प्रेयसीनेच काढला काटा
आरोपी शीतल पाटीलचे गावातील ग्रामपंचायतीचा शिपाई प्रवीण पाटीलशी प्रेमसंबंध होते मात्र प्रवीणने शीतलकडून प्रेमसंबंध असल्याचे चिठ्ठी लिहिल्यानंतर गावातील हॉट्सअॅप ग्रुपवर टाकल्याचा शीतलच्या मनात राग होता शिवाय घरातील सदस्यांसह महिलादेखील तिला टोमणे मारत असल्याने तिने दुसरा प्रियकर संभाजी पाटीलच्या मदतीने पहिला प्रियकर प्रवीणचा काटा काढण्याचा ठरवले होते. 15 फेब्रुवारी रोजी प्रवीणने शीतलला अनेकवेळा मोबाईलवर कॉल करून पहाटे शेतात बोलावले होते व याची माहिती शीतलने प्रियकर संभाजीला दिल्यानंतर दोघांनी त्याचा काटा काढण्याचे ठरवले. ठरल्याप्रमाणे शीतल शेतात आल्यानंतर मयत तिच्याजवळ येताच अंधारात लपलेल्या संभाजीने दोरीने त्याचा गळा आवळून त्याचा खून केला व मृतदेह बाबू ओंकार रोकडे यांच्या दादरच्या शेतात टाकून पलायन केले. पोलिस चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली.





यांनी उघडकीस आणला गुन्हा
खून घडल्याच्या अवघ्या 36 तासानंतर शिंदखेड्याचेपोलिस निरीक्षक दुर्गेश तिवारी यांनी उपनिरीक्षक सुशात वळवी, हवालदार रफिक मुल्ला, हर्षल चौधरी, बिपीन पाटील, ललित काळे, कैलास महाजन, तुषार पोतदार, मोहन सूर्यवंशी, गोपाळ माळी, महिला कॉन्स्टेबल तब्बसुम धोबी, प्रियंका उमाळे यांच्या माध्यमातून गुन्हा उघडकीस आणला.
