16 लाखांची सुपारी घेवून सुरतमध्ये मित्रांची हत्या : पसार कॉन्ट्रक्ट किलर जळगाव एलसीबीच्या जाळ्यात

अजिंठा चौफुलीवर आवळल्या मुसक्या : आरोपींची गुन्हेगारी पार्श्वभूमी


जळगाव : सुरतच्या उमरपाडा पोलीस ठाणे हद्दीत दोन मित्रांची हत्या करून पसार झालेल्या कुविख्यात कॉन्ट्रक्ट किलरला जळगावात स्थानिक गुन्हे शाखेने अजिंठा चौफुलीवरून गुरुवारी बेड्या ठोकल्या आहेत. अफजल अब्दुल शेख (38, रा.उमरपाडा मशिदीजवळ, सुरत) व प्रज्ञेश दिलीप गामीत (26, रा.तरकुवा डुंगरी, फलीया, ता.व्यारा, जि.तापी) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. दरम्यान, शुक्रवारी सुरत पोलिसांनी आरोपींना आपल्या ताब्यात घेतले आहे.

खून करून आरोपी पसार
सुरतमधील एमआयएमचे पदाधिकारी खुर्शीद अली सैय्यद यांनी 16 लाखांची सुपारी दिल्यानंतर दोघा कुविख्यात आरोपींनी अजरुद्दीन उर्फ अज्जू कादीर भाई शेख व बिलाल उर्फ चांदी जमीलभाई सैय्यद या मित्रांची हत्या केली होती. हत्येनंतर आरोपींनी दोघांचे मृतदेह सुरतच्या उमरपाडा हद्दीतील उंचवद गावाच्या हद्दीतील कब्रस्थानात दफन केले होते. 10 रोजी कब्रस्थानातील केयर टेकर यांना दोन मृतदेह नव्याने दफन केल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही बाब सरपंचांना कळवली मात्र गावात कुणाचाही मृत्यू झाला नसताना नवीन मृतदेह कुणाचे ? हा प्रश्न निर्माण झाल्यानंतर स्थानिक उमरपाडा पोलिसांना सूचित केल्यानंतर मृतदेहाचे बिंग फुटून खुनाचा उलगडा झाला.

पसार होण्याच्या प्रयत्नात आवळल्या मुसक्या
सुरतच्या उमरपाडा पोलीस ठाणे हद्दीतून खून करून पसार झालेले आरोपी जळगावातील अजिंठा चौफुलीवर ट्रकला थांबण्याकरीता हात देत असून पसार होण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती जळगाव गुन्हे शाखेचे निरीक्षक बबन आव्हाड यांना कळताच त्यांनी पथकाला निर्देश दिले. गुरुवारी पथकाने खातरजमा होताच आरोपींना अटक केलीे.

आरोपी कुविख्यात कॉन्ट्रक्ट किलर
अफजल अब्दुल शेख याच्यावर यापूर्वी सुपारी घेवून खून केल्याचे पाच गुन्हे दाखल आहे तर आरोपी प्रज्ञेश दिलीप गामीत याच्याविरोधात तब्ब्ल 15 गुन्हे दाखल आहेत. दोन्ही आरोपी हे सुरत येथील कुविख्यात गुन्हेगार असून त्यांच्या शोधाकरीता गुजरात पोलिसांनी 11 पथके तयार केली होती मात्र आरोपी गवसत नव्हते.

यांनी आवळल्या आरोपींच्या मुसक्या
ही कारवाई जळगाव पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक, अशोक नखाते, पोलीस उपअधीक्षक संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस उपनिरीक्षक गणेश वाघमारे, एएसआय विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, सचिन महाजन आदींच्या पथकाने केली.


कॉपी करू नका.