यावल न्यायालयात राष्ट्रीय लोक अदालतीत 45 प्रकरणात निपटारा
यावल : यावल न्यायालयात शनिवारी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीच्या पॅनल समोर ठेण्यात आलेल्या दाखलपूर्व तसेच फौजदारी आणि दिवाणी एकूण एक हजार 652 प्रकरणापैकी 45 प्रकरणांमध्ये तडजोडीने निपटारा करण्यात आला. यात 27 लाख एक हजार 689 रुपये वसूल झाले तर नव्याने लागू करण्यात आलेल्या भारतीय न्याय संहिता या कलमान्वये दाखल करण्यात आलेल्या 22 प्रकरणात देखील जलद गतीने निपटारा करून दंड वसूल करण्यात आला.
सकाळपासून पक्षकारांची गर्दी
सकाळपासूनच न्यायालयात या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी पक्षकारांची व विविध वित्तीय संस्थांच्या अधिकारी वर्गांची गर्दी होती. यावल येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात शनिवार, 27 जुलै रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय लोक अदालतीत नगरपालिका, ग्रामपंचायत, बीएसएनएल, विविध बँका, वित्तीय संस्था व राज्य विद्युत वितरण कंपनीचे बिलांचे दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आले. त्याचप्रमाणे दिवाणी आणि फौजदारी स्वरूपाचे न्याय प्रलंबित प्रकरणदेखील या लोक अदालतीत समोर न्याय निपटार्याकरीता ठेवण्यात आले होते.

यांचा पॅनलमध्ये सहभाग
राष्ट्रीय लोक अदालतीचे कामकाज पॅनल प्रमुख येथील प्रथम वर्ग न्यायाधीश आर.एस. जगताप, पॅनल अॅड. म्हणून अॅड.शेखर तडवी यांनी पाहिले. यात स्थानिक वकील संघाचे अध्यक्ष अॅड.नितीन चौधरी, सचिव अॅड.आकाश चौधरी, विधी सहाय्यक शशिकांत वारूळकर, अजय बढेसह सर्व वकील संघाच्या माध्यमातून या सर्व दाखल प्रकरणात तडजोेडीसाठी पुढाकार घेण्यात आला. पॅनलसमोर ठेवण्यात आलेल्या दाखल पूर्व, फौजदारी व दिवाणी एकूण एक हजार 652 प्रकरणांपैकी 45 प्रकरणात निपटारा करण्यात आला. एकूण 27 लाख एक हजार 689 रुपयांची वसुली करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी न्यायालयाचे सहाय्यक अधीक्षक बी.के.मोरे, लेखा विभाग प्रमुख आर.व्ही.आमोदकर, लिपिक एस.एस.पठाण, एम.एस.सोनवणे, संजीव तडवी, ए.जी.सूर्यवंशी, मेघा भंगाळे, आर.एस.बडगुजर, एस.ए.जाधव, एस.एस.झांबरे, दिपाली घनमोडे सह आदींनी कामकाज पाहिले.
