भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी देवेंद्र फडणवीस ? : लवकरच घोषणेची शक्यता !
मुंबई : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. भाजपचे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात आल्याने त्यांच्या जागी नव्या अध्यक्षाची नेमणूक होणार आहे. या पदासाठी विनोद तावडे यांच्यासह अनेक नेत्यांची नावे चर्चेत होती मात्र आता केंद्रीय नेतृत्वाने देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब केल्याची आतल्या गोटातील माहिती आहे.
देशपातळीवर काम करण्याची संधी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी भेट घेतली व लोकसभा निवडणुकीच्या निकालापासून त्यांची अनेकदा भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत खलबते झाली. देवेंद्र फडणवीस यांना आता राज्यातून देशपातळीवर काम करण्याची संधी देण्याचे भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने निश्चित केल्याची माहिती खात्रीलायक सूत्रांकडून मिळाली आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने दिले आहे.





