शासकीय जमिनीवरील अतिक्रमण थांबवण्यासह महामार्गावरील अवजड वाहतूक थांबवा
भुसावळात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमेटीचे प्रांताधिकार्यांना निवेदन
भुसावळ : भुसावळ शहरातील शासकीय जमिनींवर वाढलेले अतिक्रमण थांबवून कारवाई करावी तसेच महामार्गावरून अवजड वाहनांमध्ये राखेची वाहतूक होत असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाल्याने या संदर्भात दखल घ्यावी, अशी मागणी युवक काँग्रेसतर्फे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष योगेंद्रसिंग पाटील यांच्यातर्फे प्रांताधिकारी जितेंद्र पाटील यांच्याकडे निवेदन देऊन करण्यात आली. प्रांत कार्यालय तर्फे लुटे यांनी निवेदन स्वीकारले.
अवजड वाहनांवर व्हावी कारवाई
निवेदनाचा आशय असा की, किन्ही एमआयडीसी ते खडका चौफुलीपर्यंत दीपनगरच्या राखेची अवजड वाहनांद्वारे वाहतूक होत असल्याने रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. क्षमतेपेक्षा जास्त वजनाची राख वाहून नेली जात असल्याने खडका चौफुली परिसरात अधिक रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या संदर्भात कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली. भुसावळ विभागीय महसूल अंतर्गत शासकीय जमिनीवरती अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झाल्यामुळे सत्ताधार्यांचा दबाव झुगारून कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
अवैध धंदे खुलेआम
ग्रामीण भागामध्ये अवैध दारू विक्री सुरू असून त्यासोबच गुटखा विक्री, पत्त्यांचा जुगार आदी अनेक बेकायदेशीर धंदे सुरू असल्याने ग्रामीण भागात युवा पिढी नशेच्या आहारी गेली आहे. याबाबतही दखल घेवून कारवाईची मागणी करण्यात आली.
यांची होती उपस्थिती
निवेदन देताना जळगाव जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस रहिम कुरेशी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव सुनील जवरे, महाराष्ट्र प्रदेश भटक्या विमुक्त जाती विभागाचे सचिव सुधाकर बडगुजर, भुसावळ युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष ईस्माईल गवळी, काँग्रेसचे नेते इकबाल पिंजारी, सामाजिक कार्यकर्ता शेख आदी उपस्थित होते.