भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी काँग्रेसच्या वाटेवर !
आगामी निवडणुकांमध्ये बदलणारे गणिते : प्रदेशाध्यक्ष नाना पाटोलेंची मुंबईत भेट घेत केली राजकीय चर्चा
Former Bhusawal MLA Santosh Chaudhary on the way to Congress! भुसावळ : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने माजी आमदार संतोष चौधरी यांना रावेर लोकसभा मतदार संघातील उमेदवारीसाठी शब्द देवून नंतर ऐनवेळी उमेदवारी नाकारल्यानंतर कार्यकर्त्यांसह प्रचंड नाराज असलेले चौधरी आता काँग्रेसमध्ये प्रवेशाच्या वाटेवर आहेत. नाराज चौधरींनी बुधवारी मुंबईत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. यामुळे लवकरच ते राष्ट्रवादी शरद पवार गटाला रामराम ठोकतील हे स्पष्ट आहे. आगामी विधानसभा व त्यानंतर होणार्या नगरपालिका निवडणूकीच्या दृष्टीने भुसावळच्या राजकारणात होणार्या या बदलामुळे चुरस निर्माण होणार आहे. पटोले व चौधरी यांच्यात सविस्तरपणे राजकिय चर्चाही झाल्या.
राष्ट्रवादीने उमेदवारी कापल्याचे शल्य मनात कायम
रावेर लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे केंद्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्याला उमेदवारीचा शब्द दिल्याचे माजी आमदार चौधरी यांनी पक्षाची उमेदवारी जाहिर होण्यापूर्वीच घोषीत केले होते. ते मुंबईतून भुसावळात पोचल्यानंतर समर्थकांनी रेल्वे स्थानकावर त्यांचे जंगी स्वागत केले होते. यानंतर नाट्यमय घडामोडीत पक्षाची उमेदवारी नवागत असलेल्या व पक्षात प्रवेशही नसलेल्या रावेरच्या श्रीराम पाटील यांना मिळाली. याचे शल्य चौधरींच्या मनात आहे. यानंतर त्यांनी समर्थकांची बैठक घेवून पूढील भुमिकेबद्दल मते जाणून घेतली होती. यानंतर पुन्हा राष्ट्रवादीसोबत मनोमिलन होऊन त्यांनी उमेदवाराचा प्रचार केला. मात्र अद्यापही शब्द देवूनही उमेदवारी कापल्याचे शल्य चौधरींच्या मनात आहे. त्यांनी मुंबईत बुधवारी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची भेट घेतली. या भेटीत चर्चेनंतर त्यांचा काँग्रेस प्रवेश निश्चित मानला जात आहे.

विधानसभा, पालिका निवडणुकीचे नेतृत्व मिळेल
आगामी विधानसभेत भुसावळच्या जागेवर काँग्रेसने दावा केला आहे. आता चौधरींच्या प्रवेशानंतर हा दावा अधिक प्रबळ होईल. काँग्रेस हा महायुतीमधीलच प्रमुख पक्ष असल्याने या मतदारसंघाची जबाबदारीही आपसूकच चौधरींच्या हाती येईल. यानंतर होणार्या पालिका निवडणुका यामुळे चौधरींच्या नेतृत्वात लढल्या जातील. ते राष्ट्रवादीतच राहिले असते तर अद्यापही भाजप प्रवेश न झालेल्या एकनाथ खडसे व महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा हस्तक्षेप त्यांना सहन करावा लागला असता.
15 वर्षांत संधीच दिली नाही
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची मुंबईत भेट घेतली. काँग्रेसमध्ये प्रवेश निश्चित केला आहे. आता याबाबत कार्यकर्त्यांचा मेळावा घेवून त्यांचेही मत जाणून घेणार आहे. राष्ट्रवादीत राहून गेल्या 15 वर्षांपासून एकनिष्ठ राहूनही संधी मिळाली नाही. लोकसभा निवडणुकीत शब्द देवूनही उमेदवारी टाळली गेली. यामुळे आता राष्ट्रवादी सोडण्याचा निर्धार पक्का केला आहे. लवकरच प्रवेशाची तारीख निश्चित करू, असे भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी म्हणाले.





