किनगावातील 38 वर्षीय तरुणाचा सर्पदंशाने मृत्यू

A 38-year-old man died of snakebite in Kingaon यावल (22 ऑगस्ट 2024) : यावल तालुक्यातील किनगाव येथील 38 वर्षीय तरुणाला 16 ऑगस्ट रोजी आडगाव रस्त्यावर असलेल्या शेतात फवारणीदरम्यान सापाने दंश केला होता. त्याला प्रारंभिक किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्र व नंतर जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले होते. सहा दिवस मृत्यूची झुंज देतांना त्याचा बुधवारी मृत्यू झाला. या घटनेमुळे किनगाव परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. याबाबत यावल पोलीस ठाण्यात खबर देण्यात आली. हिंमत भास्कर पाटील (38) असे मयताचे नाव आहे.
शेतात फवारणी करताना सर्पदंश
16 रोजी शेतात फवारणी करत असतांना त्याच्या पायाला सापाने दंश केला. प्राथमिक आरोग्य केंद्र, किनगाव या ठिकाणी दाखल करण्यात आले मात्र त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला तेथून तातडीने पुढील उपचारा करीता जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले. या ठिकाणी त्याच्यावर सहा दिवस उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. मयत तरुणाच्या पश्चात आई, पत्नी, भाऊ, मुलगा असा परिवार आहे.


