उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ फोडा-फोडीत हुशार ! : मनोज जरांगेंचा हल्ला


Deputy Chief Minister Devendra Fadnavis is brilliant ! : Attack of Manoj Jarange जालना (12 सप्टेंबर 2024)  : आतापर्यंत मला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फारच हुशार राजकारणी व चाणक्य असल्याचे वाटत होते पण ते फक्त फोडा-फोडीतच हुशार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. मी त्यांना अजून आपला विरोधक किंवा शत्रू मानले नाही पण त्यांनी आम्हाला आरक्षण दिले पाहिजे, असा हल्लाबोल मराठा समाजाचे मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. गुरुवारी दुपारी आंतरवाली सराटीत पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. त्यात त्यांनी आरक्षण रद्द करण्यासंबंधी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केलेल्या एका कथित विधानासह मराठा आरक्षणाशी संबंधित विविध मुद्यांवर आपली प्रतिक्रिया दिली.

पक्षाला बाप मानणारे कित्येक आले आणि गेले
मनोज जरांगे यांनी यावेळी बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी केलेल्या टीकेचाही समाचार घेतला. या प्रकरणी त्यांनी पुन्हा फडणवीस यांचे नाव घेतले. ते म्हणाले, आम्ही गोरगरीब लोकांसाठी संघर्ष करत आहोत. तर काही ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशांनुसार सरकारी आंदोलने सुरू आहेत. समाज हुशार आहे. तो सर्व काही पाहत आहे. त्यांना देवेंद्र फडणवीस यांच्या जीवावर मस्ती आली आहे. त्यांचे दिवस जवळ आलेत. समाज त्यांचा हिशेब घेईल. राजकीय पक्षाला बाप मानणारे असे किती आले आणि गेले. भाजपही संपेल. भाजप आमदार प्रसाद लाड थोड्याच दिवस वेडे होणार अशी स्थिती असल्याचेही ते यावेळी म्हणाले.

राहुल गांधींच्या विधानाचा घेतला समाचार
मनोज जरांगे यांनी यावेळी राहुल गांधी यांच्या आरक्षण रद्द करण्याच्या कथित विधानाचाही खरपूस समाचार घेतला. मनोज जरांगे म्हणाले, त्यांना काय करायचे ते करू द्या. त्यासाठी त्यांची सत्ता तर आली पाहिजे नाही. सत्ता येण्यापूर्वीच तो काय अन् कुठून रद्द करतो. तो परदेशातून बोलला की समुद्रात उभा राहून बोलला मला काय माहिती? त्यांचा राजकीय मामला आहे. त्याचा आमच्याशी काहीही संबंध नाही.

या प्रश्नांची उत्तरे सरकारने द्यावीत
महायुती सरकारने सगेसोयर्‍याची अधिसूचना काढली, पण तिची अंमलबजावणी का केली नाही? मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याची ग्वाही देऊनही का मागे घेतले नाही? बलिदान देणार्‍या कुटुंबियांना नोकर्‍या का दिल्या नाहीत? शिंदे समितीला मुदतवाढ दिली असतानाही ही समिती काम का करत नाही? मराठ्यांचे ईडब्लूएस का रद्द केले? अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा का झाला नाही? कोपर्डी घटनेच्या आरोपीला अजून फाशी का नाही? या प्रश्नांची उत्तरे महायुतीने द्यावी, असेही मनोज जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

 


कॉपी करू नका.