भुसावळ पोलीस दलातर्फे आदर्श गणेशोत्सव मंडळांना मिळणार गणराया पुरस्कार

भुसावळ शहरातील सर्व मंडळांनी सहभाग नोंदविण्याचे आवाहन

0

भुसावळ (15 सप्टेंबर 2024) : भुसावळ पोलीस विभागातर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी यंदाही गणराया पुरस्कार देण्यात येणार आहे. गणराया अ‍ॅवार्ड सन 2024 साठी पाच सदस्यीय निवड समिती तयार करण्यात आली आहे. प्रथम, व्दितीय आणि तृतीय अशा मंडळांची निवड करण्यात येणार आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातून ठरविण्यात आलेल्या निकष व गुणांकनानुसार पात्र मंडळांना पुरस्कार दिले जातील, अशी माहिती डीवायएसपी कृष्णात पिंगळे यांनी दिली.

263 मंडळांचा सहभाग
सार्वजनिक गणेश मंडळांनी एक खिडकी व्दारे विविध परवानगी मिळवणे, आकर्षक गणेश मूर्ती, विधायक उपक्रम (रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे वगैरे), समाज प्रबोधनपर ऐतीहासीक देखावे, मिरवणुकीत पारंपारीक वाद्यांचा वापर, शिस्तबध्द मिरवणूक, मिरवणूक निर्धारीत वेळेत संपवणे, गणेश मंडळाचे आसपास स्वच्छता, इको फ्रेंडली गणेशमूर्ती, मिरवणूक तसेच मंडप परिसरात पालन केलेली ध्वनी मर्यादा, मिरवणुकीत महिलांचा सहभाग, मिरवणुकीत गुलालचा वापर न करता फुलांच्या पाकळ्या वापरणे अशा एकूण 100 गुणांपैकी ज्या मंडळास जास्तीत-जास्त गुण मिळतील अशा मंडळांना पारितोषीक देण्यात येईल. स्पर्धेमध्ये भुसावळ उपविभागातील भुसावळ शहर पोलीस स्टेशन, भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशन, भुसावळ तालुका पोलीस स्टेशनमधील 263 गणेश मंडळांचा सहभाग असेल. त्यात त्यांनी निर्धारित करण्यात आलेले निकषांचे तंतोतंत पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा
गणेशोत्सवात भुसावळ शहरात गेल्या वर्षीही गणराया अ‍ॅवार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. आदर्श व विधायक गणेशोत्सवाची संकल्पना साकार होणे हा या मागचा हेतू आहे. सन 2024 चे गणेशोत्सवादरम्यान जळगाव पोलीस दलाचे वतीने गणराया अवार्ड स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. सर्व मंडळांनी यात सहभाग नोंदवावा. आदर्श व विधायक गणेशोत्सव साजरा करावा, असे आवाहन भुसावळचे पोलीस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे यांनी केले आहे.


कॉपी करू नका.