जळगाव गुन्हे शाखेची मोठी कामगिरी : अट्टल सोनसाखळी चोरट्याला बेड्या
Jalgaon Crime Branch’s Big Achievement : Attal Sonsakhli Chortya Shackled जळगाव (21 सप्टेंबर 2024) : जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रेकॉर्डवरील सोनसाखळी चोर प्रशांत उर्फ चोर बाप्या पंडितराव साबळे (रा. सुप्रीम कॉलनी, जळगाव) याला अटक केली आहे. आरोपीने छत्रपती संभाजी नगर येथील महिलेच्या गळ्यातून सोनसाखळीसह इतर ठिकणी चोरी केल्याचे कबूली दिली.
फेब्रुवारी महिन्यात केली चोरी
छत्रपती संभाजीनगर येथे 5 फेब्रुवारी रोजी सुनीता भीमराव नेमाने (रा. शास्त्रीनगर, छत्रपती संभाजीनगर) या पायी जात असताना दुचाकीवर आलेल्या दोघां अनोळखींपैकी मागे बसलेल्याने 18 ग्रॅम वजनाची सोनसाखळी गळ्यातून हिसकावून नेली होती. ही चोरी जळगाव एमआयडीसी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार प्रशांत साबळे याने केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना मिळाली. त्यांनी सहायक फौजदार संजय हिवरकर, रवींद्र नरवाडे, अतुल वंजारी, हवालदार विजय पाटील, राजू मेढे, हरिलाल पाटील यांना कारवाईच्या सूचना दिल्या.

तीन गुन्हे उघडकीस
पथकाने प्रशांतला सुप्रीम कॉलनी येथून ताब्यात घेतले. त्याने या गुन्ह्याची कबुली दिली. या तपासादरम्यान सोनसाखळी चोरीचे तीन गुन्हे उघडकीस आले. प्रशांत हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वी दहा गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याच्या अन्य साथीदारांचा शोध सुरू आहे.
