अंतर्नादतर्फे गणेशोत्सवात पाच दिवसात 225 विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप

एक दुर्वा समर्पणाची उपक्रमांतर्गत गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दिला मदतीचा हात

0

भुसावळ : शहरात सालाबादाप्रमाणे अंतर्नाद प्रतिष्ठानने गणरायाला एक दुर्वा समर्पणाची उपक्रम राबविला. या वेळेस उपक्रमाचे आठवे वर्ष होते. गणेशोत्सवाच्या खर्चात बचत करून दात्यांनी स्वेच्छेने दिलेल्या मदतीतून गोरगरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात अक्षरमित्र पुस्तक, पाटी, पेंसील, वह्या, रजिस्टर, पेन, रंगपेटी, पट्टी, खोडरबर या वस्तुंचा समावेश आहे. निरंतर पाच दिवसापासून राबविण्यात येणार्‍या उपक्रमाचा समारोप नगरपालिका शाळा क्रमांक एकमध्ये करण्यात आला. उपक्रमाची सुरुवात यावल तालुक्यातील भोरटेक येथील जि.प. प्राथमिक शाळा येथून झाली. त्यात नंतर यावल तालुक्यातील कासवे जि.प. शाळा, अंजाळे येथील नूतन माध्यमिक विद्यालय शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती
व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून व्यापारी संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी, उदयोजक श्याम दरगड, पर्यवेक्षक व्ही.पी.सुलताने आदी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक प्रकल्प समन्वयक अमितकुमार पाटील यांनी तर अंतर्नादच्या उपक्रमाविषयी प्रकल्प प्रमुख ज्ञानेश्वर घुले यांनी माहिती दिली.आभार सह समन्वयक चंद्रकांत सूर्यवंशी यांनी मानले. सूत्र संचलन ग.स.सदस्य योगेश इंगळे यांनी केले. या प्रसंगी प्रदीप सोनवणे, शैलेंद्र महाजन, हितेंद्र नेमाडे, समाधान जाधव, विपीन वारके, दीपक परतणे, अंतर्नादचे अध्यक्ष संदीप पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

दातृत्वाच्या दिंडीचे वारकरी
उपक्रमास राजेश्वरी संदानशीवे, मामा पाचपांडे, प्रवीण बर्‍हाटे, अनन्या शिरसाठ, राजू बोंडे, अभिषेक चौधरी, देवानंद पाटील, केतन महाजन, अरुण फेगडे, भूषण कोटेचा, अलका सुरवाडे यांनी सहकार्य केले.

समाजाने सढळ हाताने मदत करावी

अंतर्नाद – एक दुर्वा समर्पणाची या उपक्रमाच्या माध्यमातून गरीब, गरजवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक साहित्याची आवश्यकता पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, जो नक्कीच कौतुकास्पद आणि प्रेरणादायी आहे. अशा उपक्रमांना समाजाने सढळ हाताने मदत करावी, असे आवाहन करताना व्यापारी संघाचे अध्यक्ष राधेश्याम लाहोटी म्हणाले, आम्हीही भविष्यात या उपक्रमाला आणि अंतर्नादला शक्य तेवढी मदत करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.

भविष्यात व्यापक स्वरूप

एक दुर्वा उपक्रमाच्या माध्यमातून गरीब आणि गरजवंत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करता आल्याचा आनंद आहे. या उपक्रमाला भविष्यात अधिक व्यापक रूप देऊन, अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे, असे अंतर्नादचे सक्रिय सद्स्य आणि ग.स.सदस्य योगेश इंगळे यांनी नमूद केले.


कॉपी करू नका.