खासदार संजय राऊत यांना 15 दिवसांचा तुरुंगवास : ‘या’ खटल्यात सुनावली शिक्षा


मुंबई (26 सप्टेंबर 2024) : शिवसेना खासदार (उबाठा) संजय राऊत हे अब्रुनुकसानीच्या खटल्यात दोषी ठरल्याने सत्र न्यायालयाने संजय राऊत यांना 15 दिवसांचा तुरुंगवास आणि 25 हजार रुपये दंड सुनावला.

असे आहे प्रकरण
100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्यात भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांचा हात असल्याचा आरोप खासदार राऊत यांनी केला होता. मेधा यांनी राऊत यांचे आरोप पूर्णपणे फेटाळून लावले तसेच राऊत यांनी आपल्यावरील आरोप निराधार आणि अपमानास्पद असल्याचे म्हटले होते. संजय राऊत यांचे हे आरोप तथ्यहीन आणि बदनामीकारक आहेत, असं म्हणत मेधा सोमय्या यांनी त्यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता.

माझगाव कोर्टात याचिका
माझगाव कोर्टात ही याचिका दाखल करण्यात आली होती. आयपीसीच्या कलम 500 अंतर्गत ही याचिका दाखल करण्यात आली होती. मागच्या काही महिन्यांपासून या प्रकरणी सुनावणी सुरु होती. सत्र न्यायालयाने हा निकाल दिलाय. आता संजय राऊत या निर्णयाला वरच्या कोर्टात म्हणजे उच्च न्यायालयात आव्हान देतात का ? हे पाहावे लागणार आहे.

तर न्यायाची अपेक्षा कशी करता येईल ?
मी न्यायालयाच्या आदेशाचा आदर करतो, पण त्यांनी असा आदेश दिला यावर विश्वास बसत नाही, असे खासदार राऊत म्हणाले. ज्या देशात पंतप्रधान गणेश उत्सवासाठी सरन्यायाधीशांच्या घरी जाऊन मोदक खातात, त्या देशात न्यायाची अपेक्षा कशी करता येईल, असेही राऊत म्हणाले.


कॉपी करू नका.