भुसावळात 16 डिसेंबर रोजी पेन्शन अदालत
भुसावळ (30 सप्टेंबर 2024) : भुसावळातील डीआरएम कार्यालयात सोमवार, 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
सेवानिवृत्तांना संपर्क साधण्याचे आवाहन
पेन्शन अदालतीचा मुख्य उद्देश सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्यांच्या पेन्शन संबंधित तक्रारींचा त्वरित आणि प्रभावी निपटारा करणे आहे. या अदालतीत पेन्शन संबंधित बाबींचा विचार केला जाईल. पॉलिसी बाबींचा समावेश असलेली तक्रार (उदा. कौटुंबिक पेन्शन प्रकरणे, नाव समाविष्ट प्रकरणे इ.), कायदेशीर मुद्दे (न्यायालयातील प्रकरणे) पेन्शन अदालतमध्ये घेता येणार नाहीत, असेही रेल्वेने कळवले आहे.

सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी त्यांच्या पेन्शन व निपटार्यासंबंधी तक्रारींचे अभ्यावेदन (तीन प्रतींमध्ये) मंडळ रेल्वे व्यवस्थापक (कार्मिक) भुसावळ यांना पाठवू शकतात. अभ्यावेदनात नाव, पदनाम, विभाग, नियुक्तीची तारीख, सेवानिवृत्तीची तारीख, बँक खाते क्रमांक, बँक आयएफएससी क्रमांक, तक्रार प्रकार याशिवाय, पेन्शन भरणा आदेश (पीपीओ) ची प्रति, बँक पासबुकची प्रति आणि इतर आवश्यक दस्तावेजही संलग्न करणे आवश्यक आहे. 30 ऑक्टोबर 2024 पर्यंत अभ्यावेदन पाठवता येणार असून अभ्यावेदन मंडळ रेल्वे व्यवस्थापक कार्यालय, भुसावळ मुख्य प्रवेशद्वाराजवळील ड्रॉप बॉक्समध्ये जमा करता येतील. सर्व सेवानिवृत्त रेल्वे कर्मचार्यांनी संधीचा लाभ घेऊन आपल्या तक्रारींचा निवारण करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
