मुक्ताईनगरच्या आखाड्यात आमदार चंद्रकांत पाटील महायुतीचे उमेदवार ! : मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुख्यमंत्री उवाच ः 50 हजारांच्या लीडने विजयाचा दावा ः लाडकी बहिण योजनेची रक्कम वाढवणार ः योजना कदापि बंद न पडण्याचा दावा


Candidate of MLA Chandrakant Patil Mahayuti in Muktainagar Arena! : Chief Minister’s announcement मुक्ताईनगर (21 ऑक्टोबर 2024) : लाडकी बहिण योजना मतांसाठी नव्हेतर बहिणींना स्वावलंबी बनवण्यासाठी सुरू केली असून ही योजना बंद पडणार नाही व आगामी काळात या योजनेची रक्कम अडीच हजार व त्याहूनही अधिक करू, अशी ग्वाही मुक्ताईनगरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. आमदार चंद्रकांत पाटील यांच्या प्रचारार्थ त्यांनी सोमवारी सायंकाळी सभा घेतली.

विरोधकांना किंमत काय कळणार
राज्यातील जनता म्हणते एकनाथ शिंदे हे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर नव्हेतर कॉमन मॅन होय त्यामुळे सर्वांना एकच सांगतो हे महायुतीचे सरकार तुमचं आहे, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी दिला. मुळातच विरोधी नेते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्याने त्यांना पंधराशे रुपयांची किंमत काय कळणार? पण, माझ्या लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयांची नक्की किंमत आहे. त्यांनी सरकारला ताकद दिलीतर हात आखडता घेणार नाही व लाडकी बहीण योजना ही कधीच बंद होणार नाही, कुणीही मायकालाल ही योजना बंद पाडू शकणार नाही, महायुतीचे सरकार ही देना बँक आहे, लेना बँक नाही, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

दोन वर्षात मुक्ताईनगर मतदारसंघात पाच हजार कोटींचा निधी
आमदार चंद्रकांत पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत मुख्यमंत्र्यांनी महायुतीच्या आमदारांच्या मतदारसंघात विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी दिल्याचे सांगत मुक्ताईनगरात दोन ते सव्वा दोन वर्षात पाच हजार कोटींचा निधी दिल्याचे सांगितले. मुख्यमंत्री शिंदे पुढे म्हणाले की, मुक्ताईनगरला आलो तेव्हा चंदुभैय्याला विचारले, शहरात सर्वत्र गर्दी आहे. मग सभेत कोणी आहे की नाही ? मात्र आता पाहिले तर सभेत पाय ठेवायला जागा नाही. हे पाहून आनंद वाटला असे सांगून मुख्यमंत्र्यांनी लाडक्या भावांना व लाडक्या बहिणींना महायुतीला विजयी करण्याचे आवाहन केले. आमदार कसा असावा तर चंद्रकांत पाटील यांच्यासारखा असावा, असेही शिंदे यांनी सांगत त्यांना 50 हजारांपेक्षा अधिक लीड मिळावा, अशी माझी अपेक्षा असल्याचेही ते म्हणाले.


कॉपी करू नका.