धुळे तालुका पोलिसांची मोठी कामगिरी : टँकर उलटल्याचा बनाव करीत 40 लाखांच्या खाद्य तेलाची अफरातफरी उघड
20 लाखांचे तेल जप्त : आरोपी चालकाचे अपघाती निधन
धुळे (5 नोव्हेंबर 2024) : गुजरातमधून सुमारे 32 टन खाद्य तेल अमळनेर येथे टँकरद्वारे आणले जात असताना वाहनाचा धुळे तालुका हद्दीत अपघात घडला. अपघाताचा गुन्हा दाखल झाल्यानंतर धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांना संशय बळावल्यानंतर त्यांनी तपासाची सूत्रे हलवल्यानंतर टँकर चालकानेच अपघात घडवून तेलाची विल्हेवाट लावल्याचे तपासात समोर आले. सुरतमध्ये पथक गेल्यानंतर संशयीत चालकाचे दोन दिवसांपूर्वीच निधन झाल्याचे समोर आले तर सुरतमधील स्थानिक पोलिसांनी अवैध खाद्यतेल म्हणून जप्त केलेला साठा हा अमळनेरच्या व्यापार्याचा असल्याचे निष्पन्न होताच 20 लाखांचा तेलाचा साठा जप्त करण्यात आला. दरम्यान, सुरतमध्ये तेलाची विल्हेवाट लावणार्या संशयीतांचा शोध घेण्याचे आव्हान आता यंत्रणेपुढे आहे.
अपघाताचा बनाव करीत फसवणूक
अमळनेरचे व्यापारी प्रेमदास प्रल्हाद सैनानी यांनी गुजरात राज्यातील गांधीधाम, कच्छ गुजरात येथून एका तेल कंपनीकडून 26 ऑक्टोबर रोजी 32 टन खाद्य तेलाची खरेदी केली. तेल आणण्यासाठी युगऋषी ट्रान्सपोर्ट कंपनी, गांधीधाम यांच्याशी भाडे तत्वावर टँकर ठरवल्यानंतर त्यांनी वाहतुकीसाठी टँकर (क्रमांक जी.जे.12 सी.टी.0550) व चालक सवाईराम खेमाराम जाट (45, राजस्थान) यास पाठवले. चालक टँकर घेवून अमळनेर येत असताना 1 नोव्हेंबर 2024 रोजी मध्यरात्री एक वाजता टँकर अकलाड फाटा, मोराणेजवळ उलटले. व्यापारी सैनानी यांनी धुळे तालुका पोलिसांना अपघाताची माहिती दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला.
चाणाक्ष पोलीस निरीक्षकांनी उघड केला गुन्हा
धुळे तालुका पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी घटनास्थळी टँकरची पाहणी केल्यानंतर शिल्लक तेल व सांडलेल्या तेलात 15 ते 18 टन तफावत आढळल्यानंतर त्यांनी तपासचके्र फिरवली. टँकरवरील जीपीएस यंत्रणेद्वारे तपासणी केली असता टँकर हे प्रवासादरम्यान बराच वेळ सुरत-गुजरातजवळ थांबलेले आढळल्यानंतर तेेथे जावून पाहणी केली असता तेथे तेलाचे अवशेष दिसून आले व त्याच ठिकाणाहून स्थानिक सुरत पोलिसांनी खाद्य तेलाचा अवैध साठा म्हणून खाद्य तेलाच्या टाक्या जप्त केल्याचे स्पष्ट झाले. फिर्यादी यांनी जप्त तेलाची ओळख पटवल्यानंतर चालक सवाईराम खेमाराम जाट यानेच तेल विकल्याचे स्पष्ट झाले व त्याच्याविरोधात गुन्हादेखील दाखल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी संशयीत आरोपी व चालक सवाईराम खेमाराम जाट याचा शोध सुरू केल्यानंतर 3 नोव्हेंबर 2024 रोजी त्याचे मोटार अपघातात निधन झाल्याचे समोर आले. धुळे पोलिसांनी सुमारे 20 लाख रुपये किंमतीचा 18 टन तेलाचा साठा जप्त केला आहे.
यांनी आणला गुन्हा उघडकीस
हा गुन्हा धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय बांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील, दीपक धनवटे, किशोर खैरनार, प्रवीण पाटील, कुणाल शिंगाणे, रवींद्र सोनवणे यांनी उघडकीस आणला.