गंगापुरी धरण परिसरातील हातभट्ट्या वनविभागाकडून उद्ध्वस्त
रावेर वनक्षेत्रात चार हजार लीटर दारुसह दोन लाख 19 हजारांचा मुद्देमाल नष्ट
रावेर (19 नोव्हेंबर 2024) : रावेर वनक्षेत्रामध्ये वन विभागाने पाडळा, गंगापुरी धरण परिसरात गावठी दारूच्या भट्टयांवर कार्यवाही करीत चार हजार 514 लीटर दारुसह दोन लाख 19 हजार 725 एव्हढ्या किंमतीचा दारू करण्यासाठीचा मुद्देमाल नष्ट केल्याने अवैध धंदे चालकांच्या गोटात घबराट पसरली आहे.
गोपनीय माहितीवरून कारवाई
रावेर येथील वनपरिक्षेत्र अधिकारी अजय बावणे यांना मिळालेल्या माहितीनुसार, वन विभागाच्या पथकाने 16 नोव्हेंबर रोजी सकाळी नियतक्षेत्र पाडळे कक्ष क्रमांक एक आणि दोनमध्ये गंगापुरी धरण परिसरात वन विभागाने कारवाई करुन राखीव वनातून पाच अवैध गावठी दारू हातभट्टया उद्ध्वस्त केल्या आहेत. या कारवाईत एकूण चार हजार 514 लीटर दारुसह दोन लाख 19 हजार 725 रुपयांचा दारू करण्यासाठीचा लागणारा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पाडले खुर्द येथील वनरक्षक यांच्याकडील प्र.रि. क्र.6/2024 अन्वये या सदंर्भात गुन्हा नोंदविण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई वनसंरक्षक निनू सोमराज, उपवनसंरक्षक जमीर शेख, सहाय्यक वनसंरक्षक समाधान पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वनक्षेत्रपाल अजय बावणे, वनरक्षक सुपडू सपकाळे, जगदीश जगदाळे, सविता वाघ, आयेशा पिंजारी, मंगला बारेला, संगीता बारेला, कियारसिंग बारेला, आकाश बारेला, नीलेश बारेला, थावर्या बारेला, वाहन चालक विनोद पाटील, वनमजूर युनूस तडवी आदींच्या पथकाने केली.
