रावेरात भक्तीला उधाण : दत्त रथोत्सवावर रेवड्यांची उधळण
दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबराचा जयघोष : वातावरण भक्तीमय
Devotional fervour in the evening : Celebration of the Datta Chariot Festival रावेर (17 डिसेंबर 2024 : हाती, घोडा पालखी, जय कन्हैय्यालाल की, दत्तात्रेय भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जय, दिगंबरा दिगंबराच्या जयघोषात रथावर रेवड्यांचीची उधळण करीत सोमवार, 16 रोजी सायंकाळी शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या रथोत्सवाची भव्य मिरवणूक काढण्यात आली. रथापुढे ढोल-ताशे तसेच आंतरराष्ट्रीय इस्कॉनचा हरे राम हरे कृष्ण पथक भाविकांचे लक्ष वेधून घेत होता.
दिगंबरा दिगंबराचा जयघोष
शहरातील मोठ्या दत्त मंदिराजवळ रथाला फुल-हारांनी सुशोभीत करण्यात आले. रथावर भगवान कृष्णाची मूर्ती, दत्तात्रेयांच्या पादुका व विघ्नहर्त्या गणपतीचे विधीवत पूजन करून रथावर ठेवण्यात आले. श्रीरंग कुलकर्णी व दीपिका कुलकर्णी यांच्याहस्ते रथाचे पूजन करण्यात आले. दत्तमंदिर संस्थानचे गादीपती श्रीपाद महाराज, ऋषिकेश कुलकर्णी व कुटुंबीयांनी रथाला दंडवत घातले. संत जनार्दन महाराज वृंदावनचे प.पू.दिनबंधू महाराज, प.पू.केशवानंद महाराज यांच्या उपस्थितीत पूजन झाले. पौरोहित्य संजीव मटकरी, कपिल महाराज, अनंत दुबे, गणेश दुबे यांनी केले. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा, दत्तात्रय भगवान की जय, गोपाळ कृष्ण भगवान की जयच्या जयघोषात भाविकांनी रथ ओढण्यास सुरुवात केली. शहरातील प्रमुख मार्गावरून रथाची मिरवणूक काढण्यात आली. ठिकठिकाणी सुवासिनींनी रथाचे पूजन केले.
रथावर रेवड्यांची उधळण
रथावर भाविकांनी रेवड्यांची मोठ्या प्रमाणावर उधळण केली. रथापुढे ढोल ताशे तसेच आंतरराष्ट्रीय इस्कॉन श्रीकृष्ण पथक लक्ष वेधून घेत होते. त्यांनी हरिकृष्ण संकीर्तन सादर केले. रथावर राजगुरू परिवारातील पुरोहितांनी भाविकांची पुजा स्विकारणे व प्रसाद वाटप केले. दत्त जयंती यात्रोत्सवानिमित्त शहरातील मंदिर परिसर, गांधी चौक, आठवडे बाजार परिसरात दुकाने थाटण्यात आली. शहरात या मिरवणुकीमुळे मोठ्या प्रमाणात यात्रा भरली आहे. रावेर तालुक्यातून मोठ्या प्रमाणात भक्त आले. रावेर शहराने या धार्मिक उत्सवात एकत्र येऊन भक्तीमय वातावरण निर्माण केले आहे.
यांचा रथोत्सवात सहभाग
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, तहसीलदार बंडू कापसे, अनिल अग्रवाल, हरिष गणवानी, अरुण शिंदे, माजी नगरसेवक अशोक वाणी, , विशाल अग्रवाल आदीसह शांतता समिती सदस्य आणि मान्यवर देखील उपस्थित होते.