मस्साजोग सरपंच हत्येची सीआयडी चौकशी ; फौजदार निलंबित, निरीक्षक सक्तीच्या रजेवर : देवेंद्र फडणवीस यांची माहिती
CID probe into Massajog Sarpanch murder ; Faujdar suspended, inspector on compulsory leave: Information from Devendra Fadnavis नागपूर (17 डिसेंबर 2024) : मस्साजोग सरपंच हत्येची सीआयडी चौकशी होणार असून या प्रकरणात आरोपींच्या शोधासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल शिवाय सीआयडीकडे हा वर्ग तपासासाठी देण्यात येत असल्याची घोषणा नागपूरातील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. हत्या प्रकरणाचा मुद्दा हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधी मंडळाच्या दोन्ही सभागृहांत उपस्थित करण्यात आला.
विरोधी पक्ष नेते दानवे आक्रमक
विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी स्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा मुद्दा लावून धरला शिवाय या मुद्यावरून स्थगन प्रस्ताव मांडत या प्रकरणातील आरोपी अजित पवार गटाचे तालुकाध्यक्ष असल्याचा मुद्दा मांडत सभागृहाचे लक्ष वेधले.
पोलीस निरीक्षक सक्तीच्या रजेवर : उपनिरीक्षक निलंबित
फडणवीस म्हणाले की, सरकारने ही घटना अतिशय गांभीर्याने घेतली आहे. या प्रकरणात हलगर्जी करणार्या पोलीस निरीक्षकाला सक्तीच्या रजेवर पाठविले आहे तर पोलीस उपनिरीक्षकाला निलंबित केले आहे. फरार आरोपींना शोधण्यावर भर देण्यात येत आहे.
सीआयकडून होणार चौकशी
सीआयडीकडे हे प्रकरण देण्यात आले असून ज्या पोलिसांनी कामचुकारपणा केला असेल त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
मंत्र्यावर नाहक अंगुलीनिर्देश होतो
मुख्यमंत्र्यांनी यावेळी राजकीय पक्ष व नेत्यांवरील आरोपांवरही भाष्य केले, हे वरिष्ठ सभागृह आहे. या सभागृहात आपण जे बोलतो, ते 14 कोटी जनतेपर्यंत जात असते. त्यामुळे मंत्र्यांच्या जवळचे वगैरे, असे ज्यावेळी बोलले जाते, त्यावेळी विनाकारण त्या मंत्र्यांचा त्यात काही सहभाग नसतानादेखील त्यांच्याकडे कुठेतरी अंगुलीनिर्देश होतो, असे फडणवीस म्हणाले.
आरोपी कोणत्या पक्षाचा आहे, जातीचा-धर्माचा आहे, कोणत्या नेत्याच्या जवळचा आहे, असा विचार न करता घटनेत सहभागी प्रत्येकावर कारवाई केली जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.