मंत्री पद डावलल्याने छगन भुजबळ वेगळी चूल मांडण्याच्या तयारीत ?
येवला (17 डिसेंबर 2024) : अजित दादाला जोडे मारो आंदोलन करू नका, कारण शहाण्याला शब्दांचे जोडे लागतात, असा टोला छगन भुजबळ यांनी मंत्री पद न मिळाल्यानंतर लगावला आहे. राज्यातील जनतेने महायुती सरकारला मोठे बहुमत दिल्यानंतर महायुतीमधील अजित पवारांच्या राष्ट्रवादीमधील दिग्गज नेते मानले जाणारे छगन भुजबळ यांना मंत्री पद न दिल्याने नाराज असलेल्या भुजबळ मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर आहे.
अजित पवारांवर निशाणा
मंगळवारी भुजबळ आपल्या मतदार संघात पोहचले. यावेळी येवल्यात त्यांनी समर्थक, कार्यकर्ते , पदाधिकार्यांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी अजित पवार यांच्यावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली आहे. भुजबळ म्हणाले, काही लोकांनी अजित दादांना धन्यवाद दिले कारण त्यांनी मला मंत्री केले नाही परंतु मंत्रिपद अनेकदा मिळाली त्यामुळे आता मंत्रिपद मिळाले नाही त्यामुळे आपण नाराज नाही. मी पहिल्यांदा महसूल मंत्री झालो होतो. आता त्यावरून पक्षांमध्ये भांडणे सुरू आहेत. विरोधी पक्षनेता झालो. त्यावेळी पवारांच्या अपेक्षेपेक्षा जास्त काम केले. 1999 मध्ये जर काँग्रेस एकत्र असती तर मी 100 टक्के मुख्यमंत्री झालो असतो. मला सोनिया गांधींपासून अनेकांचे फोन होते की तुम्ही काँग्रेस सोडू नका तुम्हाला मुख्यमंत्री करणार आहोत. पण मी पवारांच्या सोबत गेलो.
पुन्हा सगळ शून्यातून निर्माण करू
उद्या मी सर्वांचे म्हणणे ऐकून घेणार आहे मग बघू. निराश होऊ नका आणि खचून जाऊ नका. ‘जहाँ नही चैना वहा नही रहना,’ असे सांगत छगन भुजबळ यांनी राष्ट्रवादी काँग्रेस सोडण्याचा इशारा दिला. ते म्हणाले, पुन्हा सगळं शून्यातून निर्माण करू. ज्यांनी आपले काम नाही केले आपण त्यांचे काम करायचे आहे. सर्वांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. कोणाविषयी राग ठेवायचा नाही. आपण सगळ्यांनी एकजुटीने काम करायचे आहे असेही त्यांनी सांगितले.