सुकी नदी पात्रातून होणार्‍या अवैध रेती वाहतुकी विरोधात शेतकरी आक्रमक

चिनावलच्या शेतकर्‍यांना कारवाईचे तहसीलदार बंडू कापसे यांचे आश्वासन


Farmers are aggressive against illegal sand transportation from the Suki riverbed सावदा (18 डिसेंबर 2024) : चिनावल गावालगतच्या सुकी नदी पात्रातून अवैधरीत्या रेती, खरवा काढून वाहतूक होत असल्याने या नदी पात्रालगत असलेल्या शेती खाली मोठे खड्डे पडले आहे व शेती धसून खाली पडण्याची शक्यता असल्याने या विरोधात येथील शेतकर्‍यांनी मंगळवार, 17 रोजी मोठा आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर खळबळ उडाली. शेतकर्‍यांनी कोचुर-चिनावल रस्त्यावरील ज्या कामावर रेती टाकण्यात आली तेथे धडक देत संताप व्यक्त केला.

शेतकर्‍यांच्या पवित्र्यानंतर अधिकार्‍यांची धडक
यावेळी रावेर तहसीलदार बंडू कापसे, नायब तहसीलदार संजय तायडे, सर्कल यांनी खिरोदा चौधरी तसेच सार्वजनिक बांधकामचे अभियंता हेमंत महाजन आल्यानंतर त्यांना शेतकर्‍यांनी जाब विचारला. शेतीचे नुकसान होत असल्याने शेतकर्‍यांनी तीव्र संताप व्यक्त केला. कामावर टाकण्यात आलेली सुमारे 12 ते 15 ब्रास रेती शेतकर्‍यांच्या म्हणण्यानुसार तत्काळ तहसीलदार यांनी पंचनामा करून जेसीबी व ट्रकमद्वारे नदीपात्रात फैलाऊन टाकली.

अवैध वाळू उपश्याची माहिती कळवण्याचे आवाहन
नागरिकांनी नदीतून रेती व खरवा उपसण्यात येऊन त्याची विक्री होत असल्याने शेतीचे मात्र मोठे नुकसान होत असल्याची कैफियत मांडली. यावेळी तहसीलदार यांनी रावेर तालुक्यात वाळू उपसण्यास बंदी असून अद्याप ठेका झाला नसल्याची माहिती देत अश्या रीतीने अवैधरित्या रेती उपसा करणार्‍यांवर आम्ही वेळो-वेळी कार्यवाही करीत असल्याचे सांगितले शिवाय संबंधित गावातील नागरिक, पोलीस पाटील यांनीदेखील दक्ष राहून आम्हास मदत करावी व वाळू उपसा होत असल्यास वा वाहतूक होत असल्यास आम्हास कळवावे तसेच गाव पातळीवर एखादी समिती नेमावी व त्याद्वारे आम्हास कळवावे, असे आवाहन केले. वाळू वाहतूक रोखण्यासाठी त्यांनी सावदा, रावेर, निंभोरा या तिन्ही पोलीस स्टेशनमधील अधिकार्‍यांना सूचना करणार असल्याचे सांगितले. चिनावल गावातील असंख्य शेतकरी एकत्रीत झालेले होते.


कॉपी करू नका.